ब्रिटिशांनीसुद्धा विकास केला रोहित पवार यांची अजित पवारांवर टीका   

पुणे : अजित पवार हे कामाचा माणूस असल्याचा प्रचार सध्या बारामती मतदारसंघात होत आहे. यावर रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे. ब्रिटिशांनी विकास केला म्हणून सामान्य जनता त्यांच्या मागे उभे राहणार का, असा प्रश्न उपस्थित केला. अजित पवारांच्या विकासाचा आणि ब्रिटिशांच्या विकासाची तुलना रोहित पवार यांनी करत निशाणा साधला आहे. 
 
पुण्यामध्ये प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले, भाजपचे नेते शरद पवार यांना राजकारणातून संपवण्याची भाषा करत आहे. पवार कुटुंब फोडून भाजपचा हा कुटील डाव साधण्याचा प्रयत्न करत आहे. जनतेला हे पटणार नाही. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे बारामतीमधून ३ लाख मतांनी निवडून येतील, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.
 
अजित पवार हे विकास करणारे कामाची व्यक्ती आहे, असा प्रचार राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, काम करताना विचार सोडला तर तो विकास होत नाही. विकास करताना तुम्ही फक्त स्वतःचेच घर भरत राहिला तर कसे होणार. त्यामुळे विकासाचा मुद्दा पुढे आणण्यापेक्षा विचार हा जास्त महत्त्वाचा आहे.ब्रिटिश किती ताकदवान आहेत. त्यांची किती देशांमध्ये सत्ता आहे. असे म्हणून ब्रिटिशांनी विकास केला, तर काय ब्रिटिशांबरोबर सामान्य जनता गेली असती का? असा प्रश्न करत आज विचार जास्त महत्त्वाचा असल्याचा रोहित पवार यांनी म्हटले आहे.
 
रोहित पवार पुढे म्हणाले, ब्रिटिशांनी जी वृत्ती वापरून घर आणि माणसे फोडली तीच वृत्ती आज वापरली जात आहे. विकासाचा विचार केला तर बारामतीमध्ये एमआयडीसी, पुण्यात आयटी आणि धरणे शरद पवार यांच्यामुळे झाली. तरी देखील विकासापेक्षा विचार अधिक जास्त महत्त्वाचा आहे.
 
अजित पवार यांनी रोहित पवारांना बच्चा असा उल्लेख केला होता. त्यानंतर सुनील तटकरे यांनी देखील त्यांना बालवाडीचे अध्यक्ष अशी टीका केली आहे. यावर बोलताना रोहित पवार, सिंचनाच्या चिखलात ते अडकले होते. एका घराच्या पत्त्यावर १०० कंपन्या त्यांना स्थापन केल्या आणि नंतर भाजप सोबत जाऊन कारवाई थांबवायच्या, तेव्हढी बुद्धी माझ्याकडे नाही, त्यामुळे ते मला लहान समजत असतील.
 
सुनील तटकरे हे अंतुलेंचे कार्यकर्ते होते. नंतर त्यांनी त्यांना सोडले. पवार साहेबांकडे आले. नंतर पवार साहेबांना सोडले. अजित दादांबरोबर गेले. वेळ आली की सर्व प्रकार ते अजितदादांना सोडून भाजपत जातील. त्यामुळे एवढी बुद्धी माझ्यात नसल्याचा टीका रोहित पवार यांनी केली.
 

Related Articles