पुणे रेल्वे विभाग झाला ८३० किलोमीटरचा सोलापूर व मनमाड विभागातील स्थानके पुणे विभागात   

पुणे : दौंड ते मनमाड रेल्वे विभाग रविवारी मध्यरात्री पुणे विभागात दाखल झाला. सोलापूर विभागाकडून त्याची सूत्रे पुणे विभागाला सोपविण्यात आली. त्याचबरोबर तीन हजार कर्मचार्‍यांसह तब्बल २९ स्थानके पुणे विभागात समाविष्ट झाली आहेत.
 
दौंड ते मनमाड विभागामधून रोज सुमारे ९८ रेल्वेंची होणारी वाहतुकीची जबाबदारी देखील पुणे विभागाकडे आली आहे. त्यामुळे पुणे विभागातून दैनंदिन स्वरूपात धावणार्‍या रेल्वे गाड्यांची संख्या वाढली असून ती आता २९२ इतकी झाली आहे. तसेच विभागातून प्रवास करणार्‍या प्रवासी संख्येतही मोठी वाढ झाली आहे. रेल्वे बोर्डाने दौंड-मनमाडचा मार्ग पुणे विभागात समाविष्ट करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेतला होता. सोलापूर विभागातील हा अत्यंत महत्त्वाचा विभाग होता. त्यामुळे सोलापूर रेल्वे विभागाची त्याला मंजुरी अपेक्षित होते. औपचारिकता पार पडल्यानंतर २१ फेब्रुवारी २४ रेल्वे बोर्डाने या संबंधीचा आदेश काढला. एक एप्रिलपासून दौंड ते मनमाड विभागाचा २३४ किलोमीटरचा मार्ग सोलापूर विभागातून वगळून पुण्यात समाविष्ट करण्याचा आदेश दिला. त्यानुसार रविवारी मध्यरात्री ही प्रक्रिया पार पडली. यामुळे पुणे विभागाचे कार्यक्षेत्र आता २३४ किलोमीटरने वाढले आहे.
 
सोलापूर विभागातील काही भाग पुणे विभागात दाखल झाल्याने अहमदनगर, शिर्डीसारखी स्थानके विभागात आल्याने येत्या काही दिवसांत या दोन शहरांसाठी पुण्याहून डेमूसारखी सेवा सुरू होऊ शकते. नव्या गाड्यांमुळे पुण्याशी दोन शहरांची कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होईल. शिर्डी व अहमदनगर या शहरांतील नागरिकांना रेल्वेविषयक कामांसाठी सोलापूरच्या तुलनेत पुण्याला येणे सोपे झाले आहे. रेल्वेचा अपघात झाल्यास सोलापूरच्या तुलनेत पुण्याहून मदत लवकर मिळण्यास मदत होणार आहे. अहमदनगर-न्यू आष्टीदरम्यान सध्या दोन डेमू रेल्वे धावतात. हे क्षेत्रदेखील सोलापूर विभागात येत होते. त्याचे देखील हस्तांतर पुणे विभागात झाले. त्यामुळे अहमदनगर-न्यू आष्टी दरम्यान ६५ किलोमीटरचा विभाग आता पुणे विभागात दाखल झाला आहे. लवकरच बीड, परळीचा भाग पुणे विभागात दाखल होणार आहे. क्षेत्रफळाच्यादृष्टीने मध्य रेल्वेतला सर्वांत छोटा असलेला पुणे विभाग हा आता मोठ्या विभागात गणला जाईल.
 

पूर्वी पुणे विभाग होता ५३१ कि.मी.

 
पुणे विभाग पूर्वी ५३१ किलोमीटरचा होता. दौंड-मनमाड विभागातील २३४ किलोमीटरचा भाग पुणे विभागाला जोडण्यात आला आहे. तसेच अहमदनगर-न्यू आष्टी हा मार्ग पुणे विभागात समाविष्ट झाल्याने सुमारे ६५ किलोमीटर देखील पुणे विभागाला जोडले गेले. त्यामुळे आता पुणे विभाग ८३० किलोमीटरचा झाला आहे. तर सोलापूर विभागाचे क्षेत्रफळ पूर्वी ९८१ होते ते आता ७५७ किलोमीटरचा झाला आहे.
 

प्रवासी संख्येत वाढ

 
सोलापूर विभागातील २९ रेल्वे स्थानकासह काही गाड्यांचे परिचालन आता पुणे विभाग करेल. दौंड-मनमाड विभागामध्ये काही महत्त्वाची स्थानके व गुड्स टर्मिनल देखील आहेत. ते पुणे विभागात आल्याने उत्पन्न देखील वाढणार आहे. भविष्यात या मार्गावर प्रवासी रेल्वेच्या संख्येत वाढ होईल. 
 
- डॉ. रामदास भिसे, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक, पुणे
 

Related Articles