लखनऊ विरुद्ध आरसीबीचा पुन्हा विजयी पथावर परतण्याचा प्रयत्न   

बंगळुरू : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आतापर्यंत आपल्या कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरले आहे, इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये आज (मंगळवारी) त्यांचा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध होणार आहे. या सामन्यात चांगला खेळ करुन पुन्हा विजयी पथावर परतण्याचा आरसीबीचा निर्धार असेल. 
 
आरसीबीचा संघ सध्या तीन सामन्यांतून दोन गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. गेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून झालेल्या दणदणीत पराभवामुळे त्यांच्या धावगतीलाही फटका बसला आहे. तरी या सामन्यात फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघाला कमी लेखता येणार नाही, पण त्यांच्या खेळाडूंना कामगिरीत सातत्य ठेवावे लागेल. आरसीबीच्या संघात अनेक स्टार फलंदाज आहेत, परंतु विराट कोहली वगळता इतर कोणालाही चांगली कामगिरी करता आलेली नाही.आरसीबीला आपली गाडी पुन्हा रुळावर आणायची असेल, तर विराट शिवाय डु प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार आणि कॅमेरून ग्रीन यांनाही आपली कामगिरी उंचवावी लागेल. 
 
या अव्वल आणि मधल्या फळीतील फलंदाजांच्या अपयशाचा आरसीबीला फटका बसला आहे. या संघाला पुन्हा विजयी मार्गावर परत यायचे असेल, तर मधल्या फळीतील फलंदाज दिनेश कार्तिक, अनुज रावत आणि महिपाल लोमरवर यांना आपला खेळ उंचवाव लागेल. तसेच पाटीदारचा खराब फॉर्म कायम असल्याने त्याच्या जागी सुयस प्रभुदेसाईसारख्या युवा खेळाडूला संधी देण्याची गरज आहे.मात्र, आरसीबीची चिंता केवळ फलंदाजीची नाही, कारण त्यांचे प्रमुख गोलंदाज देखील आतापर्यंत चांगली कामगिरी करू शकलेले नाहीत. त्यांची वेगवान गोलंदाजी मोहम्मद सिराजवर अवलंबून आहे. ज्याने आतापर्यंतच्या तीन सामन्यांत केवळ दोनच बळी घेतले आहेत. एवढेच नाही तर धावांवर नियंत्रण ठेवण्यातही तो अपयशी ठरला आहे. सिराजने आतापर्यंत प्रति षटक १० धावा दिल्या आहेत. सिराजसह नवीन चेंडू हाताळणार्‍या अल्झारी जोसेफनेही आतापर्यंत फक्त एक विकेट घेतली असून, षटकामागे ९.४ धावा या दराने धावा दिल्या आहेत. गोलंदाजीत आरसीबीकडे रीस टोपली किंवा लॉकी फर्ग्युसनचा यांचा पर्याय आहे. 
 

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे :

 
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयान दांडगे, विजयकुमार विशाक, आकाश दीप. मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरॉन ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम कुरन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग, सौरव चौहान. 
 
लखनौ सुपर जायंट्स : केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, आयुष बडोनी, काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, देवदत्त पडिककल, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, क्रुणाल पंड्या, युधवीर सिंग, प्रेरक मंकड. यश ठाकूर, अमित मिश्रा, शामर जोसेफ, मयंक यादव, मोहसीन खान, के. गौतम, शिवम मावी, अर्शिन कुलकर्णी, एम. सिद्धार्थ, श्टन टर्नर, मॅट हेन्री, मोहम्मद अर्शद खान.
 

मयंक यादवच्या वेगाकडे लक्ष

दुसरीकडे लखनऊला कर्णधार केएल राहुलच्या तंदुरुस्तीबद्दल चिंतेत आहे. त्यामुळे त्याचा सध्या प्रभावीशाली खेळाडू म्हणून वापर केला जात आहे. त्याच्या अनुपस्थितीत निकोलस पूरन कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आहे. राहुल कर्णधार, यष्टिरक्षक आणि फलंदाज या तिन्ही भूमिकांमध्ये कधी दिसेल हे पाहावे लागेल. वेगवान गोलंदाज मयंक यादव १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत आहे, ही केवळ लखनऊसाठीच नाही तर भारतीय क्रिकेटसाठीही आनंदाची बातमी आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवरही तो आपल्या वेगाची जादू दाखवण्यासाठी सज्ज असेल. 
 

Related Articles