मीराबाई चानूचे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान निश्चित   

फुकेत, (थायलंड) : टोकियो ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेती भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने सोमवारी येथे आयडब्ल्यूएफ विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या ४९ किलो वजनी गटात तिसरे स्थान मिळवून पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले आहे.
 
दुखापतीमुळे सहा महिन्यांनी पुनरागमन करणार्‍या मीराबाईने एकूण १८४ किलो (८१ किलो आणि १०३ किलो) वजन उचलले. पॅरिस ऑलिम्पिकसाठी ही अंतिम अनिवार्य पात्रता स्पर्धा होती. या स्पर्धेत मीराबाईने पॅरिस ऑलिम्पिकसाठी निर्धारित केलेल्या निकषांची पूर्तता केली आहे. ज्यात दोन अनिवार्य स्पर्धा आणि आणखी तीन पात्रता फेरीत भाग घेणे गरजेचे असते.
 
भारताची २०१७ ची विश्वविजेती मीराबाई सध्या महिलांच्या ४९ किलो ऑलिम्पिक पात्रता क्रमवारीत (ओक्यूआर) चीनच्या जियान हुइहुआच्या नंतर दुसर्‍या स्थानावर आहे. ओक्यूआर अद्ययावत झाल्यावर पात्र खेळाडूंची अधिकृत घोषणा विश्वचषक स्पर्धेच्या समाप्तीनंतर केली जाईल. प्रत्येक वजनी गटातील शीर्ष १० लिफ्टर्स पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतील.
 
मीराबाईने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत शेवटचा भाग घेतला होता, तेथे तिला दुखापत झाली होती. तिला तिची सर्वोत्तम कामगिरी करता आली नाही, पण पाच वेळा वजन उचलण्यात तिने कोणतीही चूक केली नाही. तिने स्नॅचमध्ये ८८ किलो वजनाची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी आहे, तर २०२१ मध्ये आशियाई चॅम्पियनशिपमध्ये क्लीन अँड जर्कमध्ये ११९ किलो वजनाचा जागतिक विक्रम केला.
 

Related Articles