एकजूट टिकणार का? (अग्रलेख)   

ठराविक मुद्द्यासाठी एका व्यासपीठावर येणे वेगळे आणि निवडणुकीला एकदिलाने सामोरे जाणे वेगळे. महाराष्ट्रासह अन्यत्र जागावाटपावरून विरोधकांमध्ये आपसात जुंपली आहे. त्यामुळे विरोधक एकवटले हा निष्कर्ष चुकीचा ठरेल.
 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनासाठी राजधानीतील रामलीला मैदानावर विरोधकांची सभा झाली. पंच, कर्णधार, खेळाडू यांच्यावर दबाव आणून जसे क्रिकेट सामने जिंकले जातात, त्याप्रमाणे लोकसभा निवडणूक जिंकण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची बँक खाती गोठवली जातात, विरोधकांना तुरुंगात पाठविले जाते, हे सांगत राहुल यांनी, ही कोणती निवडणूक? असा सवाल केला. कथित मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेमुळे विरोधक एकत्र आले, हे नाकारून चालणार नाही. रामलीला मैदानावरील सभेच्या व्यासपीठावर केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना महत्त्वाचे स्थान देण्यात आले, ते लक्षणीय म्हणावे लागेल. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, उद्धव ठाकरे, सीताराम येचुरी, डी. राजा, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान व अन्य नेत्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढविला. तृणमूलचे डेरेक ओब्रायन सभेला उपस्थित होते, मात्र या सभेपेक्षा ममता बॅनर्जी यांना महुआ मोईत्रा यांच्या प्रचाराची सभा महत्त्वाची वाटली! ‘अब की बार चारसौ पार’ या घोषणेची खिल्ली उडवताना त्यांनी, दोनशे जागा तरी जिंकून दाखवा, असे आव्हान दिले. विरोधी पक्षांचे सर्व ज्येष्ठ नेते एका व्यासपीठावर आले असताना त्यापासून ममतांनी फटकून राहणे हा त्यांच्या अहंकाराचा भाग. पश्चिम बंगालमध्ये याच ताठर भूमिकेमुळे तिरंगी लढत होत असून भाजपला तेच हवे होते. 
 

यंत्रणांचा गैरवापर

 
कथित मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरण आजचे नाही; मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या प्रकरणात केजरीवाल यांना झालेली अटक संकेताला धरून नाही. अमेरिकेसह काही देशांनी यासंदर्भात नाक खुपसण्याचे कारण नव्हते. तरीही केजरीवाल यांची अटक अनेक प्रश्नांना जन्म देणारी ठरली हे नाकारता येणार नाही. मुळात, भाजपसाठी कोणत्याच पक्षाचे आव्हान नाही, अशी भाषा केली जात असताना त्या पक्षास केजरीवाल अथवा त्यांचा आम आदमी पक्ष यांची भीती का वाटावी? चारशेपेक्षा अधिक जागा जिंकण्याची ग्वाही देत विरोधकांच्या नीतिधैर्यावर आघात करणार्‍यांना पूर्वीच्या मित्र पक्षांची आठवण का यावी? वेगवेगळ्या गैरव्यवहारात ज्यांची नावे घेतली गेली अशा विरोधी पक्षांतील नेत्यांना ‘पावन’ का करून घ्यावे लागले? असे सवाल होत आहेत. भाजपकडे त्याचे उत्तर नाही. वातावरण अनुकूल असते तर तपास यंत्रणांसह अन्य यंत्रणांचा वारेमाप उपयोग भाजपने केला असता का? हा प्रश्न निर्माण होतो. अटकेमुळे केजरीवाल मोठे झाले. निवडणुकीपर्यंत त्यांचा मुक्काम तुरुंगात राहावा, ही भाजपची इच्छा पूर्ण होण्यासारखी स्थिती नाही. आता केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. जामिनावर ते बाहेर येतील तेव्हा भाजपची मोठीच अडचण होणार, असे दिसत आहे. अधिक आक्रमकपणे केजरीवाल भाजपचा सामना करु शकतात. त्यांच्या अटकेमुळे निर्माण झालेल्या वातावरणाचा फायदा विरोधकांना योग्य प्रकारे करता आला तर भारतीय जनता पक्षासमोरील आव्हान वाढू शकते. रामलीला मैदानावरील सभेत ईव्हीएमचा मुद्दा आला. त्याबाबतीत विरोधकांची भूमिका सोयीनुसार बदलत राहिल्याचे वेळोवेळी दिसले आहे. त्याचवेळी, भ्रष्टाचारविरोधातील भाजपची भूमिका केवळ तोंडदेखली असल्याचे ठळकपणे पुढे आले. मेरठमधून उत्तरप्रदेश भाजपच्या प्रचाराची सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढू असे सांगितले. आरोपांनी माखलेल्यांना पक्षात पायघड्या घातल्या जाताना आणि खुलेआम अभय मिळत असताना कुठली पाळेमुळे खणून काढली जाणार आहेत? आपल्या खेळपट्टीवर आणि आपल्या मुद्द्यांवर प्रतिस्पर्ध्याला झुंजवायचे, हे तंत्र भाजपने आतापर्यंत यशस्वीरीत्या वापरले. त्यात अडकण्याची चूक विरोधकांकडून होणार नाही, याची शाश्वती देणे अवघड आहे. रामलीला मैदानावरील एकजूट विरोधक निवडणूक प्रचारात दाखवू शकणार का? यावर त्यांचे भवितव्य अवलंबून राहील.
 

Related Articles