सुपारी फुटली, पण कोंडी फुटेना!   

मुंबई वार्तापत्र : अभय देशपांडे

 
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच मतदारसंघांत मतदान होणार असून, तेथील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शनिवारी संपली. या पाच मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तसेच राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह ९७ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.
 
पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली तरी राज्यातील महायुती व महाविकास आघाडीतील जागावाटप अंतिम झालेले नाही. किंबहुना कोंडी फुटण्याऐवजी मित्रपक्षातील तणाव वाढत चालला आहे. दुसर्‍या टप्प्यात राज्यात राज्यातील आणखी आठ लोकसभा मतदारसंघांची निवडणूक २६ एप्रिलला होणार असून तेथील उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जागावाटपाबाबत दोन्ही आघाड्यांना निर्णय घ्यावाच लागणार आहे. त्यामुळे ते होईलही; पण मित्रपक्षांमध्ये निर्माण झालेला तणाव, अविश्वास बघता यापुढचे राजकारण सोपे असणार नाही हे नक्की.
 
भाजपने चालवलेल्या दांडगाईमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीत अस्वस्थता आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने सांगली आणि मुंबईतील पाच मतदारसंघात परस्पर उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेस पक्षात प्रचंड नाराजी आहे. मैत्रीपूर्ण लढतीचे पर्याय पुढे यायला 
लागले आहेत.
 
उद्धव ठाकरे व शरद पवारांच्या हातून दोन तृतीयांश आमदार, खासदार, पक्षाचे नाव, चिन्हं गेले असले तरी आघाडीच्या जागावाटपात त्यांचाच वरचष्मा राहिला आहे. १४ आमदार असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने लोकसभेच्या २२ जागा लढणार असल्याचे स्वतःच जाहीर करून उमेदवारांचीही घोषणा केली आहे. यामुळे दोन्ही आघाड्यांवर अजूनही गोंधळाचे वातावरण आहे. जागा खेचण्यासाठी एवढी निकराची लढाई करणारे हे पक्ष निवडणुकीत किती मनापासून एकदिलाने लढतील याबद्दल शंका व्यक्त होत आहे. लोकसभेत ही स्थिती असेल तर विधानसभा निवडणुकीत काय होईल? असा प्रश्न आघाडी, युतीतील नेते करत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा मोठी राजकीय उलथापालथ झाली तर आश्चर्य वाटायला नको. लोकसभेच्या दुसर्‍या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत शुक्रवारी संपणार आहे; पण जागावाटपाचे गुर्‍हाळ काही संपत नाही. ठाणे, सातारा, नाशिक, उस्मानाबाद, रत्नागिरी - सिंधुदुर्ग आदी जागांवरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. तर सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबई आदी मतदारसंघांवरून महाविकास आघाडीत बेबनाव झाला आहे. भाजपने आत्तापर्यंत महाराष्ट्रातील २१ उमेदवार जाहीर केले आहेत. तर शिंदे गटाने ८ आणि अजित पवार गटाने दोन उमेदवार जाहीर केले आहेत. महायुतीचे तब्बल १७ उमेदवार अजूनही जाहीर होऊ शकलेले नाहीत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर १८ खासदारांपैकी १३ खासदार शिंदे गटात सहभागी झाले होते. त्यांना याची बक्षिसी मिळणार असे गृहीत धरले जात होते; पण तसे होताना दिसत नाही. २०१९ ला नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे हेमंत गोडसे निवडून आले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते शिंदे यांच्यासोबत महायुतीत आले. विद्यमान खासदाराच्या जागा त्या त्या पक्षाला देण्याचे संसदेत खासदारांनी वेगळा गट केला तेव्हाच सांगण्यात आले होते; पण राजकारणात असल्या वचनांना काडीची किंमत नसते. आमच्या सर्वेक्षणानुसार तिथे गोडसे किंवा शिवसेनेचा उमेदवार निवडून येऊ शकणार नाही, त्यामुळे ती जागा आम्ही लढवणार अशी भूमिका आता भाजपने घेतली आहे.
 
आपल्यामुळे मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे आपण सांगू ते मान्य करतील असे भाजपला वाटत असावे; पण त्यांचा हा अंदाज चुकला आहे. भाजप व शिंदेसेनेत नाशिकवरून जुंपलेली असताना राष्ट्रवादी काँग्रेसनेही नाशिकवर दावा सांगितला आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठीही अशीच तिन्ही पक्षांची रस्सीखेच सुरू आहे. उस्मानाबादची जागा शिवसेनेकडे आहे. खासदार ठाकरे गटात गेले असले तरी तानाजी सावंत यांनी या जागेसाठी आग्रह धरला आहे. सातार्‍यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा हट्ट उदयनराजे भोसले यांनी धरला होता. दिल्लीत ठाण मांडून त्यांनी उमेदवारी मिळवली आहे; मात्र अजून त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा झाली नसली तरी उदयनराजे कामाला लागले आहेत. २०१९ ला ही जागा राष्ट्रवादीने जिंकली होती. खासदार श्रीनिवास पाटील शरद पवार यांच्यासोबत असले तरी, अजित पवार गटाने या जागेवर दावा केला आहे. सातारा मिळणार नसेल, तर नाशिक द्यावेच लागेल अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
 
२०१९ला रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून शिवसेनेचे विनायक राऊत निवडून आले होते. ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. भाजपने येथून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रिंगणात उतरवण्याचे ठरवले होते; पण ते यासाठी फारसे उत्सुक नाहीत.
 
भाजपच्या दांडगाईमुळे शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता आहे. नेत्यांची टोकाची वक्तव्ये येत आहेत. मागच्या लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपला मदत केली तरी विधानसभेला भाजपने आमच्यासमोर बंडखोर उमेदवार उभे केले होते, असा थेट आरोप पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. त्याची पुनरावृत्ती करू नका, असे त्यांनी सुनावले.
 
बारामती मतदारसंघातून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात रिंगणात उतरल्या आहेत. सध्या भाजपत असलेल्या हर्षवर्धन पाटील आणि शिंदेंसोबत असलेल्या विजय शिवतारे यांनी उघडपणे अजित पवार यांना विरोध केला होता. देवेंद्र फडणवीस यांना या दोघांची मनधरणी करून शांत करावे लागले; पण त्यामुळे लगेच सगळे आलबेल होईल, असे समजण्याचे कारण नाही. किंबहुना भविष्यात मोठी उलथापालथ होऊ शकते व त्याची नांदी आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.
 

काँग्रेसची अस्वस्थता

 
एकीकडे महायुतीत जागावाटपावरून तणाव वाढत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीतही फारशी वेगळी परिस्थिती नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सांगलीसह मुंबईतील सहापैकी पाच उमेदवार जाहीर केले आहेत. राष्ट्रवादीने भिवंडीवर दावा सांगितला आहे. यामुळे काँग्रेस पक्षात अस्वस्थता आहे. भाजपविरोधात लढण्यासाठी आघाडी उभारण्याची व ती टिकवण्याची जबाबदारी केवळ काँग्रेसवर आहे का? त्याची किंमत आम्हीच द्यायची का? असा सवाल केला जात आहे. सांगलीची जागा हिसकावून घेतल्यानंतर काँग्रेसला पंतप्रधानपद हवे आहे, की सांगलीची एक जागा हवी? असा गर्भित इशारा दिला. काँग्रेसचे विशाल पाटील गेल्या दोन वर्षापासून सांगलीतून तयारी करत होते; पण शिवसेनेने डबल हिंदकेसरी चंद्रहार पाटील यांना पक्षात घेऊन त्यांची उमेदवारीही जाहीर केली. यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस नेत्यांनी तेथे मैत्रीपूर्ण लढत देण्याची तयारी सुरू केली आहे.
 

Related Articles