वाचक लिहितात   

पाणीटंचाई : आपण जागे केव्हा होणार?

 
गतवर्षी हैदराबाद येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती आणि यंदा बंगळुरू या ’आयटी’ हब शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दशकभरात पुण्यात भीषण जलसंकट निर्माण होणार असल्याचे संशोधन मध्यंतरी प्रकाशित झाले. पाण्याच्या अतिवापराने भारतात भविष्यात ताज्या पाण्याची कमतरता जाणवणार असल्याचा अहवाल मध्यंतरी प्रकाशित झाला.
 
अमेरिकेतील नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाईट सेंटर या संस्थेने पृथ्वीवरील पाणीवापराचा नकाशा तयार केला असून त्यात भारतात पाण्याच्या अतिरेकी वापरामुळे अनेक ठिकाणी आता ताजे व स्वच्छ पाणी राहिले नसल्याचा निष्कर्ष काढला आहे. देशातील ४० टक्क्यांहून अधिक जनतेला २०३० नंतर पिण्याचे पाणी मिळणार नाही, असे केंद्रीय नीती आयोगाने ’भयभाकीत’ वर्तवले आहे. 
 
महाराष्ट्रात देशातील एकूण धरणांपैकी सर्वाधिक म्हणजेच जवळपास ४० टक्के धरणे आहेत. तरी देखील राज्यातील अर्धाहून अधिक भाग हा पाण्यासाठी बारमाही आसुसलेला असतो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार भारतातील सुमारे ११० धरणे ही ५० वर्षांहून अधिक काळ वापरात असून त्यात महाराष्ट्रातील आठ धरणांंचा समावेश आहे. यात कोयना, जायकवाडी, राधानगरी वगैरेसारखी प्रमुख धरणे असून, ती ५० वर्षांहून अधिक जुनी आहेत. अशा जुन्या धरणांचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले पाहिजे. धरणांतील पाणी नेमके कुठे मुरते यासाठी पाण्याचेही नित्य नियमाने आणि कठोर ऑडिट होणे गरजेचे आहे. पावसाचे पाणी अधिकाधिक जमिनीत जिरण्यासाठी धोरणात्मक प्रयत्नांची गरज आहे. कारण आपल्याकडील पाणी प्रश्न असा आहे की, पाणी उसळत घुसळत उंच सखल भागातून जे वाहते त्याची गती कमी करायला हवी आणि पाणी जमिनीत जिरण्याचा जो गुणधर्म नाही तो कसा निर्माण करता येईल याचा विचार प्रामुख्याने करायला हवा. पावसाच्या फक्त पाच ते सात टक्के पाणी ’भूजल’ म्हणून जमिनीत जिरते; त्याचे प्रमाण वाढवले पाहिजे. आपल्याकडे पावसाचे पाणी जमिनीत न मुरता बहुतांशी वाहून जाते ते अधिकाधिक जमिनीत कसे मुरेल याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. पाणी वाचवण्याने जसे अनेक प्रश्न सुटू शकतात, तसेच पाण्याचा गैरवापर थांबवण्यानेही अनेक समस्यांवर तोडगा निघू शकतो. यासाठी प्रभावी जलव्यवस्थापनाबरोबरच निकड, गरज आणि आवश्यकता आहे ती व्यापक अशा जलसाक्षरतेची! भविष्यात पाण्यावरून युद्धे पेटतील, असे भयभाकीत अनेेेेक द्रष्ट्या जलतज्ज्ञांकडून वर्तवले गेले आहेच. मुद्दा आहे तो आपण कधी जागे होतो हा!
 

बाळकृष्ण शिंदे, पुणे

 

बॅलेट पेपरवर मतदान घ्या

 
येत्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी ’मॅचफिक्सिंग’ केल्याचे वृत्त (केसरी, पुणे ०१ एप्रिल) वाचले. सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी, तसेच विरोधक, एकमेकांवर टीका-टिप्पणी करत असलेले पाहून, त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. काँग्रेसचे राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप केला आहे. मॅचफिक्सिंगचा संबंध ईव्हीएम यंत्राशी संबंधित आहे. ईव्हीएम यंत्राद्वारे मतदाराने एखाद्या पक्षाला केलेले मतदान, दुसर्‍या पक्षाला जाऊ शकते, असा विरोधकांचा आक्षेप आहे. त्यामुळे ईव्हीएम यंत्राद्वारे मतदान घेऊ नये. त्याऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे, यासाठी विरोधकांनी कंठशोष करून पाहिला; पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मोदींना ईव्हीएम यंत्राचाच खरा आधार वाटतो काय? पंतप्रधान मोदी हे सतत काँग्रेसचा द्वेष का करतात? यावेळेस मोदींनी बॅलेट पेपरवर मतदान घेऊन निवडणुका जिंकून दाखवायला हव्यात.  
 

गुरुनाथ मराठे, बोरिवली(पूर्व), मुंबई

 

ही तर चक्क कबुलीच!

 
तुम्ही एकेकाळी ज्या नेत्यांना भ्रष्टाचाराचा ’आदर्श’ म्हणून हिणवत होतात ते नेतेच आता भाजपसोबत आहेत. याबाबत तुम्हाला काय वाटते? असा प्रश्न ’टाईम्स नाऊ’ समिट या कार्यक्रमात विचारण्यात आल्यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, आम्ही त्यांना पक्षात घेत नाही, तर ते आमच्यासोबत येत आहेत. सर्वांसाठी भाजपचे दरवाजे सदैव उघडे आहेत. आम्ही त्यांचे स्वागत करू. भाजपच्या नेते आयात धोरणाची ही जाहीर कबुलीच म्हणावी लागेल. कलंकित नेत्यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर ते निष्कलंक ठरतात आणि त्यामुळेच भाजपकडे नेत्यांना स्वच्छ करण्याचे धुलाई यंत्र आहे, अशी टीका विरोधकांकडून होत असते. अर्थमंत्र्यांच्या ताज्या विधानाने त्या टीकेला दुजोराच मिळाला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
 

दीपक काशिराम गुंडये, वरळी.

 

तंतुवाद्यांना जीआय मानांकन 

 
मिरजेतील सतार व तानपुरा या वाद्यांना केंद्र सरकारतर्फे जीआय मानांकन दिले आहे. जीआय हे एक विशिष्ट नाव आहे जे विशिष्ट भौगोलिक स्थान किंवा मूळ स्थान यांच्याशी संबंधित उत्पादनासाठी वापरले जाते. मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर (मिरज सतार) व म्युझिकल इन्स्ट्रुमेंट प्रोड्युसर या संस्थेला (मिरज तानपुरा) या वाद्यांना  जीआय मानांकन मिळाले आहे, ही बातमी नुकतीच वाचली. जीआय मानांकनने या वाद्यांना पारंपरिकता व विशिष्ट गुणवत्ता मिळेल. मिरज सोडून इतर कोणत्याही शहरातील तंतुवाद्याला याची नक्कल करता येणार नाही. इतर ठिकाणचे वाद्य मिरजेत विकता येणार नाही. मिरज येथील वाद्य कलाकारांना आता यामुळे आर्थिक वाढीसाठी प्रोत्साहनसुद्धा मिळेल. मिरजेतील सतार व तंतुवाद्याला एक मोठी परंपरा आहे. त्याचे जतन व संवर्धन होणे जरुरीचे आहे. जीआय मानांकनांमुळे हे जतन होईल व या वाद्यांना जागतिक दर्जा मिळेल.
 

शांताराम वाघ, पुणे 

 

पर्यावरण रक्षणाची कल्पना!

 
ओडिशा राज्याची राजधानी असलेल्या भुवनेश्वर येथे नंदनकानन नावाचे प्राणी संग्रहालय आणि वनस्पती उद्यान आहे. या ठिकाणी जाण्याचा योग आला. जवळपास एक हजार एकरवर पसरलेले नंदनकानन उद्यान हे भारतातील तामिळनाडूच्या पंधराशे एकरवर पसरलेल्या वंडलूर प्राणी संग्रहालयानंतर भारतातील सर्वांत मोठे प्राणी संग्रहालय आहे. नंदनकानन उद्यानातील एक नियम अतिशय वाखाणण्याजोगा आहे. तो म्हणजे एखादा पर्यटक उद्यानात जाताना जर पाण्याची, कोल्ड्रिंकची बाटली किंवा कोणत्याही प्रकारची प्लास्टिकची वस्तू घेऊन जात असेल, तर त्याच्या बाटलीवर किंवा वस्तूवर ५० रुपयांचे सुरक्षा स्टिकर लावण्यात येते. उद्यान फिरून झाल्यानंतर परत जाताना जर ही प्लास्टिकची बाटली गेटवर परत दिली की, ते ५० रुपये पुन्हा पर्यटकांना दिले जातात. ५० रुपये मिळवण्यासाठी प्रत्येकजण त्यांच्या रिकाम्या प्लास्टिक बाटल्या गेटवर परत करतो. याचा परिणाम असा झाला आहे की, अवाढव्य पसरलेल्या नंदनकाननमध्ये प्लास्टिकची एकही बाटली किंवा कचरा दिसत नाही. पर्यावरणाचे रक्षण आणि जतन करण्यासाठी ही एक चांगली कल्पना आहे.
 

प्रदीप शंकर मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई

 

शहाणपणाचा निर्णय

 
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आखाड्यातून माघार घेत असल्याचे वृत्त वाचले. अपक्ष उमेदवारही देणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. मराठा समाज आणि आरक्षण आंदोलनाचे नुकसान टाळण्यासाठी जरांगेनी घेतलेला हा निर्णय निश्चितच राजकीय शहाणपणाचा किंबहुना कौतुकास्पद आहे. एकूणच राजकीय दलदलीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे आणि आरक्षण आंदोलनाचे स्वत्व आणि सत्त्व टिकून राहावे यासाठीचा हा चांगला निर्णय आहे. आता कुणाला पाडायचे अथवा कुणाला विजयी करायचे हे मराठा समाजच ठरवेल! अर्थात असा सुज्ञपणा मराठा समाजाकडे आहे यात शंका नाही. जरांगेंच्या राजकीय शहाणपणाचे तमाम मराठा समाज निश्चितच स्वागत आणि कौतुकच करेल!
 

श्रीकांत मा. जाधव, अतीत (जि. सातारा) 

 

Related Articles