रुपया जागतिक चलन व्हावे : मोदी   

रिझर्व बँकेला ९० वर्षे पूर्ण 

 
मुंबई : भविष्यातील जागतिक आर्थिक संकटांचा सामना करण्यासाठी  येत्या दहा वर्षांत स्वदेशी अर्थव्यवस्थेची गरज आहे. रुपया हे जागतिक चलन व्हावे, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्यक्त केली. रिझर्व बँक ऑफ इंडियाला ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. १ एप्रिल १९३५ रोजी बँकेचे कामकाज सुरू झाले होेते. या वेळीं अर्थमंत्री निर्मला सीतारामन, बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास उपस्थित होते.
 
मोदी म्हणाले, रिझर्व बँकेने देशाच्या सातत्यपूर्ण आणि वेगवान विकासात मोठे योगदान दिले आहे. रिझर्व बँक देशातील बँकिंग क्षेत्राचा कणा आहे. नियम आणि धोरणांनुसार बँकेने विविध क्षेत्रांत कार्य करून देशाबरोबरच स्वत:ची प्रगती केली आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी बँकेची पत धोरण समिती पावले उचलत आहे. किंमतीवर नियंत्रण आणि आर्थिक तूट कमी करण्यात मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोनासारख्या संकटात देशाची अर्थव्यवस्था चांगली ठेवण्यासाठीं बँकेने उचललेली पावले कौतुकास्पद आहेत. 
 
ते म्हणाले, देशाच्या विकासाचा रथ आता कोणीही रोखू शकणार नाही. भारत जागतिक विकासाचा केंद्रबिंदू होणार आहे. जागतिक विकासात भारताचा वाटा १५ टक्के असेल. कोरोना संकटामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांना हादरा बसला होता. त्यातून ते देश अजूनही सावरलेले नाहीत. या उलट भारताची अर्थव्यवस्था नवे विक्रम रचत आहे. सध्या ती पाचव्या क्रमांकावर आहे. 
 
महागाई आणि विकास यांचा समतोल साधत रिझर्व बँकेला कार्य करावे लागणार असल्याचे सांगताना ते म्हणाले, दक्षिण आशियात जागतिक पातळीवरील बँक म्हणून ती उदयास येईल. येत्या दहा वर्षांत अर्थव्यवस्था आत्मनिर्भर बनवावी लागेल. त्या माध्यमातून जागतिक संकटात ती टिकून राहण्यास मदत होईल. जागतिक पातळीवर रुपया चलन अधिकाधिक वापरले जावे, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. २१ व्या शतकात संशेधनााला अनन्य साधारण महत्व आहे. त्यासाठी प्रस्ताव तयार करावेत. तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर वैयक्तिक पातळींवर व्हावा, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज आहे.तज्ज्ञांच्या मते अयोध्या भविष्यात जागतिक पर्यटन स्थळ म्हणून उदयास येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अवकाश आणि पर्यटन अशा नव्या आणि पारंपरिक क्षेत्रांकडे बँकांनी लक्ष द्यावे. बँकांनी उद्योगांना भरीव मदत करावी. तसेच राष्ट्रीय पातळीवरील प्रकल्पांना निधी द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. 
 

९० रुपयांचे विशेष नाणे

 
रिझर्व बँकेला ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ९० रुपयांचे विशेष नाणे  काढण्यात आले आहे. त्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. नाणे ९९.९९ टक्के चांदीचे असून ते ४० ग्रॅमचे आहे. या नाण्याची बाजारातील किंमत ५ हजार रूपयांच्या वर राहील. नाण्यावर रिझर्व बँकेचे बोधचिन्ह असून त्याखाली आरबीआय ९० असे लिहिले आहे. तसेच अशोक स्तंभ, सत्यमेव जयते असे लिहिले आहे. 
 

Related Articles