मुंढव्यात वाहनांना आग; वाहने पेटविल्याचा संशय   

पुणे : रस्त्याच्या बाजूला लावण्यात आलेल्या मोटार, तसेच टेम्पोला आग लागल्याची घटना मुंढवा भागात मध्यरात्री घडली. आगीत दोन वाहने पूर्णपणे जळाली. जुना मुंढवा रस्ता परिसरातील बोराटे वस्ती परिसरात एका इमारतीसमोर टेम्पो आणि मोटार लावण्यात आली होती. मध्यरात्री दोनच्या सुमारास टेम्पो आणि मोटारीने पेट घेतला. मोटार, टेम्पोने पेट घेतल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर झाला. नागरिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली.
 
अग्निशमन अधिकारी सुभाष जाधव आणि जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. आगीत कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख सुभाष जाधव यांनी दिली. आगीमागचे कारण समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. टेम्पो, मोटार पेटवून देण्यात आल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून चाैकशी करण्यात येत आहे.

Related Articles