इंडिया ग्रिड : परताव्याची अक्षय ऊर्जा   

भाग्यश्री पटवर्धन

 
इंडिया ग्रिड ट्रस्टने जून २०१७ मध्ये सूचिबद्ध झाल्यापासून डिसेंबर २०२३ पर्यंत प्रति युनिट ८२.४१ रु. पासून ४,६६७ कोटी रु. वितरित केले आहेत. दीर्घकाळ गुंतवणूक तीही सुरक्षित आणि जोखीम मुक्त करायची आहे, त्यांना हा पर्याय उपलब्ध आहे.
 
सध्याच्या निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत शेअर बाजारापासून एक हात लांब राहिलेले बरे असा विचार तुमच्या मनात आल्यास त्यात वावगे काही नाही; मात्र उपलब्ध गुंतवणूक पर्यायांमध्ये बँक ठेवीच्या परताव्याच्या तुलनेत अधिक परतावा आणि कमी जोखीम, स्थिरता असे निकष पूर्ण करणारा एखादा पर्याय असेल तर ! हो असा आणखी एक पर्याय शेअर बाजारातच उपलब्ध आहे आणि त्याचे नाव इंडिग्रिड इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. या कंपनीच्या नावात  ग्रिड असा शब्द असल्याने कदाचित तुमच्या  लक्षात आले असेल की, ऊर्जा क्षेत्राशी संबंधित या कंपनीचे किंवा ट्रस्टचे कामकाज आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने म्हणजे केंद्र सरकारच्या रस्ता वाहतूक मंत्रालयाने जसे एनएचएआय इन्व्हिट बाजारात आणले, तसेच युनिट या कंपनीनेही बाजारात आणले आहेत. या कंपनीने प्राथमिक भागविक्री केली त्यावेळी १०० रुपये किंमत ठेवण्यात आली होती. सध्या या कंपनीच्या शेअरचा भाव १३० रुपयाच्या घरात आहे.
 
इन्व्हिट्स आज विविध पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये ४ लाख कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करत आहे. पुढील दशकात त्यात ६-८ लाख कोटी रुपयांची भर होण्याची शक्यता आहे. इंडिया ग्रिड ट्रस्टने जून २०१७ मध्ये सूचिबद्ध झाल्यापासून डिसेंबर २०२३ पर्यंत प्रति युनिट ८२.४१ रु. पासून ४,६६७ कोटी रु. वितरित केले आहेत. आज भारतात सेबीकडे नोंदणीकृत २४ इन्व्हिट्स असून त्यांनी २०१९ पासून इक्विटीमध्ये १ लाख कोटी रु.हून अधिक निधी उभारला आहे. २४ पैकी १४ इन्व्हिट खाजगीरित्या सूचिबद्ध आहेत आणि ४ सार्वजनिकरीत्या सूचिबद्ध आहेत. सार्वजनिकरीत्या सूचिबद्ध असलेले ४ इन्व्हिट्सचे एकत्रित बाजार भांडवलमूल्य २५,००० कोटी रु. इतके आहे. गेल्या दशकभरात भारतातील पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, २०१७ पासून ६७ लाख कोटी रु.हून अधिकची गुंतवणूक झाली आहे. याशिवाय, सरकारच्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाइपलाइन (NIP) आणि राष्ट्रीय मुद्रीकरण योजनेसह (NMP), पायाभूत मालमत्ता विकास आणि त्याचे मुद्रीकरण या लक्षणीय वाढीचे साक्षीदार आहेत. इन्फ्रा डेव्हलपमेंट मूल्य साखळीमध्ये इन्व्हिट्सच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानामुळे विकसकांना खेळते भांडवल आणि गुंतवणूकदारांना आकर्षक पर्याय मिळतो.
 
ज्या कंपनीबाबत आजच्या स्तंभात चर्चा केली आहे त्यात (इंडिग्रिड) केकेआर, जीआयसी अशा जगातील नामांकित वित्त संस्थांचा हिस्सा आहे. यावरून भविष्यात त्यातील गुंतवणुकीद्वारे चांगला परतावा मिळेल हे नक्की. त्याचे आणखी एक कारण एखादे कुटुंब किंवा व्यक्ती या कंपनीचे व्यवस्थापन पाहत नसून तो एक ट्रस्ट आहे आणि त्याचे कामकाज सेबीच्या इन्व्हिट कार्यकक्षेनुसार चालते. इंडिग्रिडचा विचार केल्यास कंपनीला ८० टक्के गुंतवणूक कर्जरोख्यात करावी लागते आणि प्रति युनिट किमान रक्कम ३.५५ रुपये चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीसाठी आहे.  २०२४ अखेर प्रति युनिट १४ रुपये दहा पैसे वितरित केले जातील अशी अपेक्षा  आहे. कंपनीचे महसुली उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत २८ टक्के वाढले आहे. कंपनी सध्या २६७ अब्ज रुपयांची मालमत्ता व्यवस्थापन करत आहे. त्यातील ९० टक्के प्रकल्प हे ऊर्जा क्षेत्रातील आहेत. देशातील पहिले utility-scale Battery Energy Storage Purchase a­greement (BESS­) कंपनीने बीएसईएस राजधानी पॉवर कंपनीसोबत केले आहे. कंपनीच्या शेअरचा कमाल किमान भाव (५२- wk high सह १४१.५१ ५२- wk low १२१.००) असा आहे. ज्यांना दीर्घकाळ गुंतवणूक तीही सुरक्षित आणि जोखीम मुक्त करायची आहे त्यांना हा पर्याय उपलब्ध आहे. रिन्यूएबल पॉवर क्षेत्रात सरकार करत असलेल्या सुधारणा पाहता आगामी काळात हा शेअर चांगला परतावा देईल.
 

नियामकांच्या अटी गुंतवणूकदारांसाठी सुरक्षा कवच

 
इन्व्हिट कंपन्यांसाठी सेबीने जी बंधने किंवा अटी घातल्या आहेत त्या एक प्रकारे गुंतवणूकदारांसाठी एक सुरक्षा कवच आहे. त्या अटी अशा इंडिग्रिड त्यामुळे जोखीममुक्त आहेत. किमान नेट डिस्ट्रिब्युटेबल कॅश फ्लो म्हणजे कंपनीकडे जमा होत असलेल्या वितरण योग्य रोख रकमेपैकी ९० टक्के. 
रक्कम युनिट धारकांना वाटणे बंधनकारक
 
  1. कंपनी ज्या प्रकल्पात भांडवल गुंतवते त्यापैकी ८० टक्के चालू स्थितीत हवेत आणि दैनंदिन रोख रक्कम जमा होणे गरजेचे 
  2. जोखीम कमीत कमी राहावी यासाठी कमाल मर्यादा ७० टक्के
  3. किमान पतदर्जा ट्रिपल ए
  4. महत्त्वाच्या निर्णयांना युनिट धारकांची मान्यता आवश्यक.
 
(‘गुंतवणूक मित्र’ पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या लेखांमधील मते त्या त्या तज्ज्ञांची आहेत. गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा निर्णय आपल्या जबाबदारीवर घ्यावा.)

Related Articles