लालकृष्ण अडवानी यांचा भारतरत्न सन्मानाने गौरव   

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांना रविवारी भारतरत्न सन्मानाने गौरविण्यात आले. अडवानी यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना भारतरत्न सन्मान प्रदान करण्यात आला. या वेळी उप राष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा आणि अडवानी यांच्या  कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.  
 
लालकृष्ण अडवानी यांनी सात दशके देशाची सेवा केली. देशाच्या विकासात अमूल्य योगदान दिल्याबद्दल त्यांना भारतरत्न सन्मानाने गौरविण्यात आले आहे. त्यांचा जन्म १९२७ मध्ये कराचीत झाला होता. फाळणीनंतर ते १९४७ मध्ये भारतात आले होते. सांस्कृतिक राष्ट्रवादाचा प्रसार त्यांनी अनेक दशके केला. त्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय परिवर्तनाला चालना मिळाली. आणीबाणीच्या काळात लोकशाही टिकून राहावी, यासाठी त्यांनी संघर्ष केला. माजी पंतप्रधान अटल बिहारी वााजपेयी आणि लालकृष्ण अडवानी या जाोडीने भाजप हा काँग्रेसला पर्याय असल्याचे दाखवून दिले. भाजपची निरंतर प्रगतीत दोघांचा वाटा मोठा आहे. दोन खासदारांवरून १८० पेक्षा अधिक खासदार संसदेत निवडून आणण्याचा विक्रम त्यांनी केला. भाजपचे पहिले पंतप्रधान होण्याचा मान अटल बिहारी वाजपेयी यांना मिळाला होता. अडवानी ९७ वर्षांचे असून त्यांनी  जून २००२ ते मे २००४ पर्यंत उप पंतप्रधानपद भूषविले होते. ऑक्टोबर १९९९ ते मे २००४ दरम्यान ते केंद्रीय गृहमंत्री होते. भाजपचे त्यांनी  १९८६ तेे १९९९, १९९३ ते १९९८ आणि २००४ ते २००५ दरम्यान अध्यक्षपद भूषविले होते.
 

Related Articles