दहा वर्षांतील विकास केवळ झलक : मोदी   

मेरठ : गेल्या दहा वर्षांत केलेला विकास ही केवळ झलक आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पाच वर्षांत विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्यक्त केला.उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये भाजपच्या प्रचारास काल प्रारंभ झाला.  त्यावेळीं ते प्रचार सभेत ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हरयानाचे मुख्यमंत्री नाईब सिंह सैनी, मेरठचे भाजपचे उमेदवार, अभिनेते अरुण गोविल, भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नुकतेच सामील झालेले राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष जयंत चौधरी उपस्थित होते. 
 
मोदी म्हणाले, विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचा रोड मॅप तयार केला जात आहे. मेरठ ही क्रांतिकारांची भूमी आहे. चौधरी चरण सिंग यांच्या सारखे नेते याच मातीत घडले. केेंद्रात भाजपचे सरकार तिसर्‍यांदा सत्तेत येणार आहे. पाच वर्षांतील विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी १०० दिवसांत निर्णय घेतले जाणार आहेत. ते म्हणाले, भविष्यात आणखी विकास देशात पहायला मिळणार आहे.
 

भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोदून काढणार 

 
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी भ्रष्टाचार्‍यांना पाठिशी घालत आहे. परंतु भ्रष्टाचार्‍यांविरोधातील कारवाई सुरूच राहणार आहे, कठोरतेने भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोदून काढणार आहे, असा इशारा पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांनी दिला. ज्यांनी भ्रष्टाचारातून देशाची संपत्ती लुटली. ती त्यांना परत करावीच लागणार आहे. तोंडे आणि प्रतिष्ठा पाहून कारवाई कधीच केली जात नाही. मी जेव्हा भ्रष्टाचाराविरोधातील लढाईत उतरतो तेव्हा संपूर्ण ताकदीने उतरतो. इंडिया आघाडी स्थापन करून माझ्यावर टीका केली जात आहे; परंतु ती केल्याने कारवाईची तीव्रता कमी होईल, असे त्यांचे स्वप्न असेल तर ते स्वप्नच राहणार आहे. कारण भ्रष्टाचार्‍यांविरोधात कारवाई सुरूच राहणार आहे.
 

Related Articles