काँग्रेसला प्राप्तिकराची आणखी एक नोटीस   

नवी दिल्ली : काँग्रेसला प्राप्तिकर विभागाने रविवारी आणखी एक नोटीस बजावली आहे. त्या अंतर्गत २०१४-१५  ते २०१६-१७ दरम्यानचा १ हजार ७४५ कोटी रुपये कर भरण्यास सांगितले आहे. त्यामुळे पहिल्या आणि काल बजावलेल्या नोटिशीमुळे एकूण ३ हजार ५६७ कोटींचा कर काँग्रेसला भरण्यास सांगितले आहे. 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २०१४-१५ (६६३ कोटी), २०१५-१५ (सुमारे ६६४ कोटी) आणि २०१६-१७ (सुमारे ४१७ कोटी), कर भरण्यास सांगितले आहे. राजकीय पक्षांसाठी विभागाने करात सुट देण्याची पद्धत रद्द केली असून सर्व रक्कमेवर कर आकरण्यास सुरुवात केली आहे. विभागाने काँग्रेसच्या काही नेत्यांवर छापे टाकले होते. तेव्हा डायर्‍या जप्त केल्या होत्या. त्यांच्या संपत्तीवरही कर लागू केला आहे. 
 
काँग्रेस पक्षाने शुक्रवारी सांगितले की, प्राप्तिकर विभागाने आम्हाला नोटीस पाठवली असून सुमारे १ हजार  ८२३ कोटी भरण्यास सांगितले आहे. विभागाने खात्यातून अगोदरच गेल्या वर्षाच्या करापोटी १३५ कोटी वसुल केले आहेत. १३५ कोटी प्रकरणी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या संदर्भातील सुनावणी आज (सोमवारी) होणार आहे. यापूर्वी काँग्रेसने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु तेथे दिलासा मिळाला नव्हता. पक्षाला प्राप्तिकर लवादाकडे जाण्यास सांगितले होेते. 
 
काँग्रेसप्रमाणे भाजपच्या नेत्यांवर केलेल्या कारवाईत डायर्‍या प्राप्तिकर विभागाने जप्त केल्या होत्या. परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही,  लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने कर दहशतवाद सुरू केला आहे. विरोधकांना निवडणुकीपूर्वी नामोहरम करण्यासाठी कारवाई केली जात आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच या संदर्भातील तक्रार निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. 
 

Related Articles