संयुक्त राष्ट्रांचे चार कर्मचारी लेबनॉनमध्ये गोळीबारात जखमी   

बेरूत : दक्षिण लेबनॉनमध्ये शनिवारी झालेल्या बॉम्ब हल्ल्यात संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेचे तीन निरीक्षक आणि एक अनुवादक जखमी झाले. हे लोक या परिसरात पायी जात असताना एक बॉम्ब त्यांच्या जवळ आला. या बॉम्बच्या तुकड्यांमुळे या भागात तैनात असलेले संयुक्त राष्ट्राचे जवान जखमी झाले आहेत.
 
संयुक्त राष्ट्राने या हल्ल्याचा निषेध केला आहे, तर इस्रायलने या हल्ल्याशी कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. लेबनॉनचा हा भाग इराण समर्थित संघटना हिजबुल्लाच्या प्रभावाखाली आहे. येथे गेल्या ८ ऑक्टोबरपासून इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात अधूनमधून संघर्ष सुरू आहे.
 
दरम्यान, इजिप्तची राजधानी कैरोमध्ये शनिवारी पुन्हा एकदा इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविरामावर अप्रत्यक्ष चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही बाजूंचे शिष्टमंडळ कैरोमध्ये उपस्थित आहेत, परंतु ते इजिप्त आणि कतारच्या मध्यस्थीने चर्चा करत आहेत. गाझाच्या अन्न समस्येला दिलासा देण्यासाठी युरोपियन देशांचे दुसरे जहाज ४०० टन खाद्यपदार्थ घेऊन सायप्रसला रवाना झाले आहे. पुढील आठवड्यात ते गाझापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
 

गंभीर आजारी नागरिकांना बाहेर काढणार

 
गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात ७५ हजारांहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. यातील हजारो नागरिकांची प्रकृती चिंताजनक आहे. याशिवाय इतर कारणांमुळेही हजारो जण गंभीर आजारी आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस धानोम गेब्रेयसस यांनी म्हटले आहे की, गाझा पट्टीतील नऊ हजार रुग्णांना तातडीने चांगल्या उपचारांची गरज आहे. त्यांना हे उपचार फक्त गाझा बाहेरील इतर देशांमध्ये मिळू शकतात. त्यामुळे या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांना तात्काळ गाझाबाहेर पाठवावे.
 

अमेरिका इस्रायलला बॉम्ब आणि फायटर विमान देणार 

 
इस्रायलला अनेक अब्ज डॉलर्सचे बॉम्ब आणि लढाऊ विमाने देण्याच्या प्रस्तावाला अमेरिकेने मंजुरी दिली आहे. यामध्ये अमेरिका इस्रायलला विविध प्रकारचे ४ हजार ८०० बॉम्ब देणार आहे. अमेरिका दरवर्षी ३.८ अब्ज डॉलर्सची लष्करी मदत इस्रायलला देते. गाझामध्ये इस्रायलच्या भीषण लष्करी कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय दबावाचा सामना करत असलेल्या बायडेन सरकारला देशांतर्गत आघाडीवरही टीकेला सामोरे जावे लागत आहे, असे असतानाही इस्रायलच्या मदतीत कोणतीही कपात करण्यात आलेली नाही.
 

Related Articles