खैबर पख्तूनख्वामध्ये मुसळधार पावसात सात जणांचा मृत्यू   

पेशावर : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात गेल्या २४ तासात मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे अनेक घरे कोसळून पाच मुलांसह सात जणांचा मृत्यू झाला, अधिकार्‍यांनी ही माहिती दिली. शनिवारी सलग दुसर्‍या दिवशी खैबर पख्तुनख्वाच्या भागात मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. बाजौर आदिवासी जिल्ह्यात पावसामुळे अनेक घर कोसळल्याने तीन मुलांसह पाच जण ढिगार्‍याखाली गाडले गेले. शांगला जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे खोलीचे छत कोसळल्याने दोन मुलांचा मृत्यू झाला, असे प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (पीडीएमए) सांगितले. या पावसामुळे खैबर आदिवासी जिल्हा, पेशावर, नौशेरा आणि चारसड्डा जिल्ह्यांतील पिकांचे नुकसान झाले. 
 

ईशान्य भारतात वादळासह मुसळधार पावसाचा अंदाज 

 
नवी दिल्ली : देशातील अनेक भागात सूर्य आग ओकत असून, बहुतांश राज्यांमध्ये आता दिवसा तपमानात वाढ होऊ लागली आहे. मात्र, भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) आज (सोमवारी) ईशान्य भारतात वादळासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत जम्मू आणि काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये वादळ आणि विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता   वर्तविण्यात आली आहे. याशिवाय अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर आणि मिझोराममध्ये विजांचा कडकडाट जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच आणखी काही ठिकाणी पाऊस पडू शकतो.  आयएमडीने म्हटले आहे की, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
 

Related Articles