माझा नेता पलटूराम निघाला!   

शिवतारेंना कार्यकर्त्यांचे खरमरीत पत्र

 
बारामती, (वार्ताहर) : शिवसेना नेते विजय शिवतारे यांना त्यांच्याच कार्यकर्त्यांनी खरमरीत पत्र लिहिले आहे. हे पत्र समाज माध्यमात पुरंदरचा तह या शीर्षकाखाली प्रसारित झाले आहे. शिवतारे यांनी अजित पवारांच्या विरोधात बंडाची सळसळती तलवार गर्जना करीत उपसली खरी. मात्र देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी त्यांची बंडाची तलवार म्यान करीत अजित पवार यांना पाठिंबा दिला. मात्र, या पाठिंब्याने माझा नेता पलटूराम निघाला, आता साडेपाच लाख पवारविरोधी मतदारांनी काय करायचे ? असा प्रश्न शिवतारेंना त्यांच्याच एका कार्यकर्त्यांनी खरमरीत पत्र लिहित उपस्थित केला आहे.
 
पत्रात म्हटले आहे की, ‘बापू, तुम्ही बंडाची भूमिका घेऊन बारामती लोकसभेची निवडणूक ‘अपक्ष’ लढवण्याचा निर्धार केला होता. त्यानंतर माध्यमांनी तुम्हाला डोक्यावर घेतले. तुमची स्फोटक विधाने गाजू लागली. त्यानंतर तुम्ही जेजुरीच्या खंडोबाच्या साक्षीने ‘एल्गार’ पुकारला. ‘काहीही झालं तरी आता माघार नाही’, ‘बारामती कोणाची जहागिरी नाही’ यासह तुमची अनेक विधाने गाजली. तुम्हाला समर्थक मिळाले. माय-बाप जनता, पदाधिकारी कार्यकर्ते यांची ‘वज्रमूठ’ तुम्ही उभी केली. प्रसंगी शिवसेनेचा ‘राजीनामा’ देऊ. पण, आता निर्णय घेतलाय, ही तुमची भूमिका अवघ्या महाराष्ट्रात गाजली. मात्र बापू, तुम्ही  अचानक माघार घेतली आणि आमचीही मोठी अडचण झाली.
 
बापू, पवारांच्या विरोधातल्या ५ लाख ८० हजार मतदारांनी आता नेमके काय करायचे? आज तुम्हाला अजित पवारांचा काय साक्षात्कार झाला? आता तुम्ही रामायणातील बिभीषण आहात की नाही ? हेही आम्हाला कळू द्या.  
 

Related Articles