भाजप कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नाही, तोपर्यंत मावळच्या उमेदवाराचे काम करणार नाही   

बैठकीत श्रीरंग बारणेंविरोधात नाराजीचा सूर

 
पिंपरी : मावळ लोकसभेचे विद्यमान खासदार व सध्याचे उमेदवार यांनी मागील दोन टर्म  भारतीय जनता पक्षाच्या जीवावर खासदार होऊन दहा वर्षांच्या कालावधीत भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्याला कोणतीही विचारणा केलेली नाही किंवा मदतही केली नाही, विश्वासात देखील घेतले नाही, अशा उमेदवाराला आम्ही मदत का करावी ? असा सवाल उपस्थित करत भाजप कार्यकर्ते, मंडल अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, बूथ कार्यकर्ते, वॉरियर्स यांनी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच, भाजप कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जात नाही, तोपर्यंत निवडणुकीत काम न करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.पिंपरी-चिंचवड भाजपच्या मोरवाडी येथील मध्यवर्ती कार्यालयात सर्व बूथ प्रमुख, वॉरियर्स, मंडल अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी यांची रविवारी आढावा बैठक पार पडली. यामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी विद्यमान खासदार व मावळ लोकसभा उमेदवार श्रीरंग बारणे यांच्याबाबत नाराजीचा सूर व्यक्त केला. 
 
भाजप प्रदेशाकडून याबाबत गंभीरतेने दखल घेवून शहराध्यक्षांना जोपर्यंत विश्वास दिला जात नाही. जोपर्यंत शहराध्यक्ष कार्यकर्त्यांना आदेश देत नाहीत, तोपर्यंत भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचे काम करणार नाही, असा एकत्रित सूर कार्यकर्त्यांनी बैठकीत मांडला. याप्रसंगी बूथ प्रमुख, पदाधिकारी कार्यकर्ते यांनी नाराजी मांडत राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. प्रदेश पदाधिकार्‍यांनी हा विषय गंभीरतेने घेऊन सर्व कार्यकर्त्यांना विश्वास द्यावा, असे मत भाजपचे पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) सरचिटणीस संजय मंगोडेकर यांनी यावेळी व्यक्त केले. 
 
यावेळी प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, महेश कुलकर्णी, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, सरचिटणीस नामदेव ढाके, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे, युवा मोर्चा शहराध्यक्ष तुषार हिंगे, मंडल अध्यक्ष सोमनाथ भोंडवे, प्रसाद कस्पटे, उपाध्यक्ष बिभीषण चौधरी, माजी नगरसेवक सुरेश भोईर, संकेत चौंधे, रवींद्र प्रभुणे, कोमल शिंदे यांच्यासह सर्व बूथ प्रमुख, वॉरियर्स, मंडल अध्यक्ष, प्रदेश सदस्य, जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Related Articles