केंद्रीय मंत्री संजीव बल्यान यांच्या ताफ्यावर हल्ला   

प्रचारादरम्यान वाहनांची तोडफोड

 
लखनौ : केंद्रीय राज्यमंत्री आणि मुझफ्फरनगरमधील भाजपचे उमेदवार संजीव बल्यान यांच्या ताफ्यावर शनिवारी रात्री अज्ञातांनी हल्ला केला. दगडफेक करत प्रचाराच्या १५ वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. यात दहा जण जखमी झाले आहेत. सुदैवाने बल्यान या हल्ल्यातून बचावले. 
 
शनिवारी बल्यान हे खतौली कोतवाली भागातील मडकरीमपूर गावात एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. कार्यक्रमात माजी आमदार विक्रम सैनी यांचे भाषण सुरू असताना काही जणांनी घोषणाबाजी सुरू केली. काही वेळातच जमावातील काही लोकांनी बल्यान यांच्या ताफ्यावर दगडफेक सुरू केली. वाहनांवर दगडफेक होताच गावात घबराट पसरली. या हल्ल्यात १५ वाहनांच्या काचा फुटल्या. या हल्ल्यात बल्यान बचावले असून सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, त्यांचे दहा कार्यकर्ते या हल्ल्यात जखमी झाले आहेत.या प्रकाराबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधीर सैनी म्हणाले की, बल्यान यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे विरोधक हताश आणि निराश झाले आहेत. म्हणूनच असे भ्याड हल्ले केले जात आहेत. हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचे वाटते. दरम्यान, या संपूर्ण घटनेची गांभीर्याने चौकशी करण्यात येत आहे. तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिस अधिकारी सत्यनारायण प्रजापती यांनी दिली.
 

Related Articles