धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर पुन्हा मैदानात   

विरोधात प्रवीणसिंह परदेशी की राणा जगजीतसिंह पाटील? निर्णय दोन दिवसात 

 
सोलापूर, (प्रतिनिधी) : धाराशिव लोकसभा निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून पुन्हा एकदा शिवसेनेचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना महाविकास आघाडीच्यावतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी की आमदार राणा जगदीशसिंह पाटील यापैकी कोण लढणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  शिवसेनेच्या  मशाल या चिन्हावर आपल्या राजकीय जीवनातील चौथ्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ओमराजे निंबाळकर सज्ज झाले आहेत. यापूर्वी ओमराजे निंबाळकर यांनी दोनदा विधानसभा आणि एक लोकसभा निवडणूक लढविली आहे. त्यापैकी एका विधानसभा निवडणुकीत आणि लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय संपादन केला आहे. तिन्ही निवडणुकांमध्ये त्यांच्यासमोर पारंपरिक स्पर्धक म्हणून आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांचे आव्हान होते. चौथ्यांदा ओमराजे निंबाळकर यांच्यासमोर महायुतीच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी कोण? हे अद्याप निश्चित झालेले नाही. २०१४ सालच्या निवडणुकीत शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन ओमराजे, तर राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर राणा जगदीशसिंह पाटील यांनी एकमेकाला आव्हान दिले होते.  दुसर्‍यांदा निवडणुकीला सामोरे जात असलेल्या ओमराजे निंबाळकर यांना यावेळी मतदारांनी नाकारले होते. राणा जगदीशसिंह पाटील यांचा सुमारे ११ हजार मतांनी विजय झाला आणि ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या राजकीय कारकिर्दित दुसरी निवडणूक ते हरले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा हे दोन्ही प्रतिस्पर्धी एकमेकांच्यासमोर विरोधात आले. पराभूत आमदार ओमराजे यांना शिवसेनेने लोकसभेची संधी दिली.  मोदींच्या सभेने जादू केली आणि तब्बल १ लाख २७ हजार मतांनी ओमराजे निंबाळकर विजयी झाले. आता चौथ्यांदा ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. समोर पुन्हा तोच पारंपरिक प्रतिस्पर्धी? की आणखी दुसरा कोण? तसेच निकालाची तीच परंपरा कायम राहणार का? याकडे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी जागा कोणत्या पक्षाला आणि नंतर कोणता उमेदवार? या गोष्टी स्पष्टपणे समोर आलेले नसल्यामुळे सद्य:स्थितीत महायुतीकडून जाहीर प्रचार अद्याप सुरू झालेला नाही. जागावाटप आणि उमेदवारी यावर येत्या दोन दिवसांत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.  त्यानंतर धाराशिव लोकसभेमध्ये महायुतीच्या अधिकृत उमेदवाराचे नाव समोर आल्यानंतर खर्‍या अर्थाने प्रचाराला सुरुवात होणार आहे.
 

Related Articles