माजी आमदार दिलीप माने स्वगृही   

प्रणिती शिंदे यांना निवडणुकीत बळ मिळणार 

 
सोलापूर, (प्रतिनिधी) : दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने हे रविवारी पाच वर्षांनंतर स्वगृही काँग्रेस पक्षात परतले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत दिलीप माने यांनी मुंबईत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माने यांच्या काँग्रेस प्रवेशाचा फायदा सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना होणार आहे. त्यामुळे माने यांची दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील ताकद शिंदे यांच्या पाठीशी उभी राहणार आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आमदार होण्यासाठी दिलीप माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र पराभूत झाले. आता पुन्हा एकदा दक्षिणमधून आमदारकीचे स्वप्न उराशी बाळगूनच माने यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.
 
दिलीप माने यांनी २८ ऑगस्ट २०१९ रोजी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला होता. विधानसभेची २०१९ ची निवडणूक त्यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघाऐवजी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून लढवली होती. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात शिवसेनेच्या तिकिटावर माने यांनी लढत दिली होती. मात्र, शिवसेनेचे महेश कोठे यांनीही अपक्ष म्हणून याच मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि मतविभागणीचा फायदा आमदार प्रणिती शिंदे यांना झाला. शिवसेनेचे महेश कोठे आणि दिलीप माने या दोघांचाही सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून पराभव झाला. तेव्हापासून माने हे शिवसेनेपासून दूरच गेले होते.
 
महाविकास आघाडी सरकारच्या काळात माने हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळ गेले होते. विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांची आजही घट्ट मैत्री आहे. त्यातूनच जेव्हा अजित पवार हे सोलापूर दौर्‍यावर आले होते, तेव्हा त्यांनी दिलीप माने यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. मात्र, आघाडीत दक्षिण सोलापूर मतदारसंघ काँग्रेसकडे आहे, त्यामुळे त्यांनी काँग्रेस प्रवेशाचा निर्णय घेतला होता. 
 
त्यानुसार माने यांनी रविवारी मुंबईत काँग्रेसचा ‘हात’ हाती घेतला. दिलीप माने विधानसभेला दक्षिण सोलापूरमधून २००९ मध्ये निवडून आले होते. मात्र, पुढील २०१४ च्या मोदी लाटेत भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्याकडून माने पराभूत झाले. पुढे त्यांनी हाताची साथ सोडत उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत मनगटावर शिवबंधन बांधले. मात्र मधली काही वर्षे सर्वच राजकीय पक्षांपासून अंतर राखून वागणारे दिलीप माने यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला होता. 
 
सुशीलकुमार शिंदे यांनीसुद्धा एका कार्यक्रमात दिलीप माने यांचा मित्र म्हणून उल्लेख केला होता. आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी काँग्रेसचा पर्याय निवडल्याचे स्पष्ट झाले आहे. तर लोकसभा निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माने यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.
 

Related Articles