प्रादेशिक पक्षांपुढे राष्ट्रीय पक्ष हतबल   

आंध्र प्रदेश

 
आंध्र प्रदेशमध्ये सध्या ‘वायएसआरसीपी’चे सरकार आहे. मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांचा या राज्यावर प्रभाव आहे. आंध्र प्रदेशमधील आणखी एक महत्त्वाचा पक्ष म्हणजे चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगु देसम पक्ष. सात वर्षांपूर्वी त्यांनी ‘एनडीए’शी संबंध तोडले. तेव्हापासून ते भाजपपासून दुरावले होते. आता मात्र, ते एनडीए आघाडीसोबत निवडणूक लढवत आहेत. येथे दोन प्रादेशिक पक्षांच्या साठमारीत काँग्रेस आणि भाजपला याचकाच्या भूमिकेत रहावे लागते, हे मात्र नक्की.
 
आंध्र प्रदेशमध्ये भाजप अनेक जागांवर मजबूत स्थितीत नाही, तर ‘टीडीपी’लाही भाजपसोबत येण्याचा विशेष फायदा झालेला नाही; पण तरीही दोन्ही पक्षांना एकत्र यावे लागले. या युतीमागे एकीकडे भाजप आंध्र प्रदेशच्या माध्यमातून दक्षिण भारतात बस्तान बसवण्याचा प्रयत्न करत असताना ‘टीडीपी’चाही फायदा असल्याचे मानले जात आहे. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा दिला जात नसल्याचे सांगून ‘टीडीपी’ एनडीएपासून दुरावली आणि तो मिळाला नसला, तरी घोटाळ्यात अटक झाल्यानंतर नायडू ‘एनडीए’सोबत गेल्याने परत आले. युतीच्या माध्यमातून राज्यात पुन्हा सत्तेत येण्याची आशा त्यांनी व्यक्त केली. आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेच्या २५ आणि विधानसभेच्या १७५ जागा आहेत. याआधी ‘एनडीए’चा भाग असताना २०१४ च्या निवडणुकीत ‘टीडीपी’ने १५ जागा जिंकल्या होत्या तर भाजपने दोन जागा जिंकल्या होत्या. वेगळे झाल्यानंतर, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ‘टीडीपी’ला केवळ तीन जागा जिंकता आल्या तर भाजप शून्यावर आला.२०१४ मध्ये दोन्ही पक्ष एकत्र असताना ‘टीडीपी’ने विधानसभेच्या १०२ जागा जिंकल्या होत्या तर भाजपला चार जागा जिंकता आल्या होत्या. वेगळे झाल्यानंतर २०१९ च्या निवडणुकीमध्ये ‘टीडीपी’ने विधानसभेच्या २३ जागा जिंकल्या, तर भाजपला एकही जागा जिंकता आली नाही. भाजप आणि ‘टीडीपी’ला एकत्र आणण्यात अभिनेते आणि ताज्या दमाचे राजकारणी पवन कल्याण यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे मानले जाते. पवन कल्याण हेदेखील ‘टीडीपी’ आणि भाजपसोबत युती करून निवडणूक लढवत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांचा जनसेना पक्ष युतीमध्ये आहे. या आघाडीमध्ये ‘टीडीपी’ने विधानसभेच्या २४ आणि लोकसभेच्या तीन जागा पवन कल्याणच्या ‘जेएसपी’ला दिल्या आहेत.
 
आंध्र प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षांना आपले स्थान निर्माण करण्यासाठी प्रादेशिक शक्ती आणि चेहर्‍यांची मदत घ्यावी लागते. गेल्या निवडणुकीतील मतांचा आधार घेतल्यास दोन्ही पक्षांचा पाठिंबा प्रत्येकी एक टक्का आहे, असे दिसून येते. उल्लेखनीय हे आहे की, २०१४ मध्ये देखील भाजपने संयुक्त आंध्रच्या ४२ जागांसाठी टीडीपीसोबत युती केली होती. त्या वेळी ‘टीडीपी’ने १६, भाजप तीन, वायएसआर काँग्रेस नऊ, बीआरएस ११, काँग्रेस दोन आणि एआयएमआयएम एक असे पक्षीय बलाबल होते. पण २०१८ मध्ये आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरून ‘टीडीपी’ वेगळा झाला. वायएसआर काँग्रेस संसदेत एनडीएचा भाग नसतानाही बहुतांश मुद्द्यांवर सत्ताधारी पक्षासोबत दिसत होती. वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वाय. एस. जगनमोहन आंध्र प्रदेशमधील आपले स्थान वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. आपले सरकार आणि खासदारांना सत्ताविरोधी वातावरणाचा फटका बसू नये, म्हणून त्यांनी गेल्या २७ तारखेपासून आपल्या लोककल्याणकारी योजनांचा प्रसार करण्यासाठी सार्वजनिक मोहिमेंतर्गत २१ दिवसांचा बस प्रवास सुरू केला आहे. १४ खासदारांची तिकिटे रद्द करून नवीन चेहरे देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तरीही काही आमदार, खासदारांनी त्यांच्या पक्षाचा त्याग केला. अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्याकांसाठी राबवल्या जाणार्‍या लोककल्याणकारी योजना लोकांमध्ये ठळकपणे घेऊन जात आहेत. येथे एनडीए व्यतिरिक्त जगन यांच्यासाठी त्यांच्याच कुटुंबातील आव्हान आहे. त्यांची बहीण वाय. एस. शर्मिला वडील वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या राजकीय वारशात आपला वाटा असल्याचा दावा करत आहे. काँग्रेसने त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्याच वेळी भाजपने एका उमेदवाराला तिकीट नाकारल्याने तो धाय मोकलून रडला. त्याने कमळावर अश्रूपात केला.
 

Related Articles