चाकण बाजारात कलिंगडासह खरबूज, मोसंबीला मागणी   

चाकण, (वार्ताहर) :  उन्हाच्या तडाख्यामुळे आणि उन्हाच्या वाढत्या झळांमुळे कलिंगडासह पाणीदार फळांची प्रचंड आवक झाली आहे. उन्हाच्या काहिलीपासून दिलासा मिळावा म्हणून नागरिकांची पावले आता थंडगार पेये असणार्‍या उपाहारगृहांकडे वळू लागली आहेत. त्यातल्या त्यात चाकण बाजारात सध्या खरबूज, कलिंगड, डाळिंब, मोसंबी, संत्री व द्राक्षांना मोठी मागणी वाढली आहे. 
 
चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये दररोज पंचवीस ते तीस टन खरबूज, संत्री, द्राक्ष व कलिंगडाची आवक होत आहे. मागणी व आवक वाढल्याने कलिंगड व खरबुजाचे भाव कमी झाले आहेत, मुस्लिम समाजाचे रमजान महिन्यातील उपवास सुरु असल्याने मागणी वाढली आहे. फळांचे दर घसरल्याने सर्वाधिक फटका फळउत्पादक शेतकरी व व्यापार्‍यांना बसत आहे. इतर फळांच्या तुलनेत कलिंगडाच्या भावात दहा टक्क्यांनी घट झाली आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये श्रीगोंदा, श्रीरामपूर, पारनेर, संगमनेर, करमाळा व धुळे आदि  जिल्ह्यांसह पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, खेड व जुन्नर तालुक्यातून कलिंगडाची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. चाकण येथे ठोक बाजारात सध्या कलिंगडाचे भाव ३० ते ३५ रुपये किलो आहेत. मालाला मागणी वाढल्याने उत्पादक  शेतकरी समाधानी आहेत.  
 
खरबुजाला २५ ते ३० रुपये किलो असा दर  आहे. किरकोळ बाजारात सध्या कलिंगड चाळीस ते पन्नास रुपये किलो या दराने विकला जात आहे. तर खरबूजही किरकोळ बाजारात ४० ते ५० रुपये किलोने विकला जात आहे. वाढत्या उष्णतेमुळे व त्यात सध्या रमजान ईदच्या उपवासामुळे कलिंगड, खरबूज, आंबे, मोसंबी, डाळिंब, पपई, काळी व हिरवी द्राक्ष या मधूर चव असणार्‍या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त व त्यातील पाणी चवीला सर्वाधिक गोड असल्याने बाजारात या फळांना प्रचंड मागणी आहे.

Related Articles