अदानी समूहाचा वीज प्रकल्प रद्द करा   

प्रकल्पग्रस्तांची मागणी 

 
सातारा, (प्रतिनिधी) : तारळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कळंबे, डफळवाडी, तोंडोशी या ठिकाणी शेतकर्‍यांना उद्ध्वस्त करणारा अदानी ग्रुपचा हायड्रो पॉवर प्रोजेक्ट रद्द करावा, जनसुनावणी रद्द करावी, अशी मागणी या प्रकल्पामुळे बाधित होणार्‍या प्रकल्पग्रस्त व लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी केली आहे. तसेच या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चादेखील काढण्यात येणार आहे. यासाठी ७ एप्रिल रोजी लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांचा मेळावा घेणार असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी जाहीर केले.
 
शेतकर्‍यांच्या मेळाव्यात पाटणकर बोलत होते. या मेळाव्यास बाधित होणारी गावे आणि लाभक्षेत्रातील गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. पाटणकर म्हणाले, हा पॉवर प्रोजेक्ट  पूर्णपणे अव्यवहार्य असून, यामध्ये तेलंगणा राज्यातील एका प्रकल्पाचा अहवाल जोडून चुकीचा अहवाल तयार केला आहे. यामध्ये येथील जैवविविधता, निसर्ग साधन संपत्ती, वन्यजीव, भूकंपप्रवण क्षेत्र याचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख केलेला नाही. तारळी धरणाच्या लाभक्षेत्रात असलेल्या गावातील सिंचनावर काय परिणाम होणार आहे, याचा उल्लेख केलेला नाही. काही लोक विकासाला विरोध करू नका म्हणून सांगतात; परंतु आधीच तालुक्यातील धरणांमध्ये ज्यांनी जमिनी दिल्या. त्यांचे काय हाल झाले व होत आहेत. याचा विचार केला आहे का?. त्यामुळे राजकीय पक्ष बाजूला ठेऊन जनतेने एकत्र लढा देऊन जन सुनावणी रद्द करून घेऊ.
 
या वेळी प्रशांत पवार, उत्तम मगर, राजाभाऊ जगधनी, प्रदीप निकम, भाऊसाहेब निकम, शंकर पन्हाळकर, जोतिराम जाधव, जोतिराम जाधव, खबाले बापू, अभिजित जाधव, सखाराम सपकाळ, ज्ञानदेव सपकाळ, भरत जाधव, आनंदा सपकाळ, जयसिंग पन्हाळकर, बाजीराव पन्हाळकर, शिवाजी जाधव आदी उपस्थित होते. 
 

Related Articles