वळसे-पाटील यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी   

मंचर, (वार्ताहर) : सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या डाव्या पायावर व हातावर पुणे येथील खासगी रूग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांची फोन करून विचारपूस केली. वळसे-पाटील यांना भेटण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे रूग्णालयात आल्या होत्या. त्यांनी कन्या पूर्वा वळसे-पाटील यांच्याकडे त्यांच्या तब्बेतीसंदर्भात विचारपूस केली. 
 
पुणे येथील निवासस्थानी वळसे-पाटील पाय घसरून जमिनीवर पडले होते. त्यांच्या डाव्या खुब्याला व हाताला दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना तातडीने औंध परिसरातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.  त्यानंतर राजकारणातील अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. राजकीय मतभेद बाजूला ठेवत शरद पवार यांनीही वळसे-पाटील यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. वळसे-पाटील यांना डॉक्टरांनी महिनाभर आराम करण्याचा सल्ला दिला आहे.  
 

Related Articles