शहरात ईस्टर उत्साहात   

चाळीस दिवसांच्या उपवासाची सांगता; प्रभू खरोखरच उठला, या घोषाने परिसर दुमदुमला

 
पुणे : ख्रिश्चन बांधवांचा पवित्र सप्ताह आणि चाळीस दिवसांच्या उपवासाची सांगता रविवारी ईस्टर संडेच्या प्रार्थनेने झाली. येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थान दिवसाच्या निमित्ताने कॅथलिक आणि प्रोटेस्टंट अशा दोन्ही संप्रदायांच्या चर्चमध्ये धर्मगुरूंच्या उपस्थितीत ख्रिश्चन बांधवांनी विशेष प्रार्थना केली.ईस्टर संडेची सुरुवात भल्या पहाटे काढलेल्या पुनरुत्थान दिंड्यांनी झाली. पहाटे चार वाजता ठिकठिकाणी काढलेल्या दिंड्यांमध्ये भाविक सहकुटुंब सहभागी झाले होते. या दिंड्यांची सांगता सकाळी सहाच्या दरम्यान झाली. शहरातील अनेक चर्चमध्ये भक्तांनी मोठी गर्दी केली होती. रास्ता पेठ परिसरात प्रभातफेरी काढण्यात आली.
 
यावेळी प्रभू येशूच्या पुनरुत्थानाची कथा भाविकांना  सांगण्यात आली. ईस्टर संडेनिमित्त युवावर्गाने दिवसभर सोशल नेटवर्किंग साईटवरून नातेवाईक आणि मित्र मंडळींना हॅपी ईस्टरचे संदेश पाठविले. उपासनेसाठी काही चर्चमध्ये सभासद, महिला मंडळ, तरुण संघ आणि संडे स्कूलचे शिक्षकही उपस्थित होते.
 
’ईस्टर हा ख्रिस्ती लोकांसाठी नाताळएवढाच महत्त्वाचा सण आहे. या दिवशी येशू ख्रिस्त मरणातून पुन्हा उठला, या अद्भुत घटनेच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो. स्वर्गारोहण होईपर्यंत पुढील चाळीस दिवस ख्रिस्ताने आपल्या शिष्यांसह इतरांना दर्शन दिले.या घटनेची सविस्तर कथा बायबलमधील चारही शुभवर्तमानात सांगितली आहे. हा सण फक्त ख्रिस्तीच नव्हे, तर सर्व धर्माच्या लोकांना आशीर्वादाचा आणि आध्यात्मिक लाभाचा झाला पाहिजे, अशी प्रतिक्रिया उपस्थित धर्मगुरुंकडून देण्यात आली. 
 
शहरातील वडगांवशेरी येथील फेल्लोवशिल चर्च, रास्ता पेठेतील ख्राईस्ट चर्च, स्वारगेट परिसरातील शिलोह चर्च, कसबा पेठेतील ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्च, लष्कर येथील सेंट मेरी चर्च यासह काही छोट्या चर्चमध्ये विशेष प्रार्थनाचे आयोजन करण्यात आले होते. स्वारगेट येथील शिलोह चर्चमध्ये येशूचे पुनरुस्थानवर विशेष नाट्यप्रसंग साकारण्यात आला. अशा विविध चर्चमध्ये धर्मगुरूंच्या मार्गदर्शनाखाली ईस्टर संडे उत्साहात साजरा करण्यात आला. अशा रितीने ख्रिश्चन बांधवांचा पवित्र सप्ताह आणि चाळीस दिवसांच्या उपवासाची सांगता रविवारी ईस्टर संडेच्या प्रार्थनेने झाली. त्यावेळी विविध चर्चमध्ये सामूहिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते.
 

Related Articles