आरटीई प्रवेशाचे अर्ज लवकरच भरता येणार   

पुणे : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबविली जाणारी आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे येत्या ७ एप्रिलपासून विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने तयारी केली आहे, असे राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. त्यामुळे आरटीई प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणार्‍या पालकांना लवकरच आपल्या पाल्याचा आरटीई प्रवेशाचा अर्ज भरता येणार आहे. तसेच चालू शैक्षणिक वर्षांपासून आरटीई प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षणाचा अंतर्भाव केला जाणार आहे. 
 
आरटीई कायद्यात झालेल्या बदलामुळे सरकारी व खासगी अनुदानित शाळांमध्ये सुध्दा आरटीईअंतर्गत प्रवेश दिले जाणार आहेत. त्यामुळे यंदा आरटीई प्रवेशासाठी पात्र असलेल्या शाळांची संख्या वाढली आहे. यंदा राज्यातील ७५ हजार ८५६ शाळांमधील ९ लाख ७१ हजार २०३ जागांवर आरटीईतून प्रवेश दिले जाणार आहेत. मात्र, त्यास कसा प्रतिसाद मिळतो हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
 
राज्यात आरटीई प्रवेशासाठी शाळा नोंदणी व विद्यार्थी प्रवेश क्षमता यात वाढ झाल्याचे दिसून येत असले तरी सर्व प्रवेश हे शासकीय किंवा खासगी अनुदानित शाळांमध्येच होतील, असे बोलले जात आहे. त्यामुळे विविध पालक संघटनांनी या प्रक्रियेस विरोध केला होता. मात्र, शासनाकडून त्याची गांभीर्याने दखल घेतली 
गेली नाही.
 

Related Articles