भारतीय संघातील खेळाडूंना आयपीएलमध्ये विश्रांती देण्याची शक्यता   

मुंबई : आयपीएल २०२४ च्या थकवणार्‍या दोन महिन्याच्या हंगामानंतर अवघ्या काही दिवसातच टी २० वर्ल्डकप २०२४ ची सुरूवात होणार आहे. वेस्ट इंडीज येथे होणार्‍या टी २० वर्ल्डकपचा विचार करता भारतीय संघातील अनेक खेळाडूंना आयपीएलमध्ये विश्रांती देण्याची शक्यता वर्तवली जात होती.
 
मात्र बीसीसीआय सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने आयपीएल फ्रेंचायजींना भारतीय खेळाडूंसाठी वर्कलोड मॅनेजमेंटबाबत कोणत्याही सुचना दिलेल्या नाही. त्यामुळे २ जून पासून सुरू होणार्‍या टी २० वर्ल्डकपपूर्वी भारतीय खेळाडूंची चांगलीच दमछाक होण्याची शक्यता आहे. त्यात संघातील अनेक खेळाडू हे दुखापतीतून नुकतेच सावरले आहेत.
 
तर काही खेळाडू हे दुखापग्रस्त झालेले आहेत. बीसीसीआय सूत्रांनी सांगितले की, ’नक्कीच एखादा केंद्रीय करारामधील खेळाडू किंवा टार्गेटेड खेळाडू हा दुखापतग्रस्त होतो त्यावेळी तो एनसीएच्या वैद्यकीय टीमच्या देखरेखीखालीच उपचार घेतो. प्रत्येक करारबद्ध किंवा टार्गेटेड खेळाडूला एनसीएला त्याच्या दुखापतीबाबत कळवणे बंधनकारक आहे. मात्र ज्यावेळी खेळाडू फ्रेंचायजीशी करारबद्ध असतात त्यावेळी बीसीसीआय त्यांना किती सामने खेळावे याबाबत कोणतेही आदेश देत नाही. गोलंदाजांचा विचार केला तर सामन्यात फक्त ४ षटके टाकायची आहेत. वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत होणार्‍या टी २० वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा ही एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.बीसीसीआय सूत्राने सांगितले की, ’भारतीय टी २० संघाची निवड ही एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होईल. यावेळी आयपीएलचा अर्धा हंगाम संपलेला असेल. त्यावेळी निवडसमितीला संघ निवडण्यासाठी अडचण होणार नाही. तसेच खेळाडूंचा फिटनेस देखील विचारात घेता येईल. तसेच भारतीय संघातील काही खेळाडू हे १९ मे रोजी अमेरिकेसाठी रवाना देखील होतील.
 

Related Articles