डेविड वॉर्नरचे झंझावाती अर्धशतक   

विशाखापट्टणम : सलग दोन सामन्यांत शानदार विजय मिळवून यंदाच्याही आयपीएलमध्ये ठाम वाटचाल सुरू करणार्‍या गतविजेत्या चेन्नईचा सामना कसा करायचा, हा प्रश्न रिषभ पंत याच्या दिल्ली संघाला पडला होता मात्र  दिल्लीचा सलामीवीर डेविड वॉर्नर याने अवघ्या ३५ चेंडूत ५२ धावा करत शानदार अर्धशतक साकारले. त्यामुळे दिल्लीच्या संघाने २० षटकांत १९१ धावा केल्या. यावेळी ५ फलंदाज गमावले. दिल्लीने चेन्नईला १९२ धावांचे आव्हान दिले. 
 
वॉर्नरला साथ देणारा पृथ्वी शॉ हा ४३ धावांवर बाद झाला. त्याचे अर्धशतक थोडक्यात हुकले. त्यानंतर तिसर्‍या क्रमांकावर आलेला रिषभ पंत याने ५१ धावा करत दुसरे अर्धशतक दिल्लीच्या संघासाठी केले. मिचेल मार्श हा १८ धावांवर बाद झाला. अक्सर पटेल हा ७ धावांवर नाबाद राहिला. अभिषेक पोरेल याने ९ धावा केल्या. 
 
पराभवाची हॅट्ट्रिक टाळण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. ट्वेन्टी-२० प्रकारात लौकिकाच्या बाता केवळ नाणेफेक होईपर्यंत ताज्या असतात. मैदानात उतरल्यावर सर्वोत्तम कामगिरी करणारा संघच बाजी मारत असतो. कर्णधार बदललेला असला तरी सूत्रे हाती असलेल्या महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई संघ दिल्लीवर गेल्या चार सामन्यांत भारी ठरलेला आहे. हे सामने त्यांनी ९१, २७ आणि ७७ धावांनी जिंकलेले आहेत. गतवर्षी रिषभ पंत दिल्ली संघात नव्हता, मात्र इतर बहुतेक खेळाडू तेच असल्याने दिल्लीकरांना नव्या मानसिकतेनुसार आता मैदानात उतरावे लागणार आहे. 
 
चेन्नई संघात ४२ वर्षीय धोनीचा अपवाद वगळता तसे फार नावाजलेले खेळाडू नाहीत. परंतु प्रत्येक खेळाडू आपले नाणे खणखणीत वाजवत आहे म्हणून यंदाही पहिले दोन सामने त्यांनी जिंकलेले आहे. या संघाविरुद्ध कशी व्यूहरचना करायची याचे कोडे एकेकाळी ऑस्ट्रेलियाचा निष्णात कर्णधार असलेल्या आणि आता दिल्ली संघाचा प्रशिक्षक असेल्या रिकी पाँटिंगला सोडवावे लागणार आहे. दिल्ली संघाच्या व्यवस्थापनात सौरव गांगुलीचाही समावेश आहे. तरीही त्यांना दोन सामन्यांत विजयाचा मार्ग शोधता आलेला नाही.
 
भारतीय संघातून दूर असलेला अजिंक्य रहाणे चेन्नई संघात तिसर्‍या क्रमांकावर खेळतो. तर भारताच्या ट्वेन्टी-२० संघात सध्या विचारही न होत असलेला शिवम दुबे हा त्यांचा हुकमी एक्का आहे. यंदाच्या मिनी लिलावात ८.४० कोटी रुपयांची किंमत मोजलेला नवखा समीर रिझवी पंजाबविरुद्ध पहिल्यांदा मैदानात येतो आणि दोन खणखणीत षटकार मारून आपली गुणवत्ता सादर करतो. या तुलनेत दिल्ली संघात गलेलठ्ठ रक्कम मिळालेले आणि नावाजलेले खेळाडू आहेत. परंतु त्यातील कोणालाही ठोस कामगिरी करता आलेली नाही. दिल्ली संघ व्यवस्थापन अजूनही चाचपडत आहेत याचे उदाहरण म्हणजे रिकी भूई. या खेळाडूने नुकत्याच संपलेल्या रणजी क्रिकेट मोसमात सर्वाधिक ९०२ धावा केल्या.

Related Articles