एप्रिलअखेरीस होणार विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड   

नवी दिल्ली : आयपीएलचा धुमधडाका देशात सुरू झाला आहे आणि स्पर्धा अंतिम टप्प्यात असताना ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारताचा १५ सदस्यांचा संघ जाहीर केला जाईल. १ मे पर्यंत अंतिम खेळाडूंची यादी आयसीसीला कळवायची असल्यामुळे एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात संघ निवड करावी लागणार आहे. ही ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धा वेस्ट इंडीज-अमेरिका येथे संयुक्तपणे होणार आहे. १ मे पर्यंत संघातील खेळाडूंची यादी देण्यात आली तरी त्यात २५ मे पर्यंत बदल करण्याची मुभा असणार आहे.
 
आयपीएलचा पहिला टप्पा संपत येत असताना एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात निवड समितीची बैठक होईल, त्यात संघ निवडला जाईल. आयपीएलमुळे संभाव्य खेळाडूंचा फॉर्म आणि तंदुरुस्तीही तपासता येईल, असे बीसीसाआयच्या वरिष्ठ पदाधिकार्‍याने सांगितले. १९ मे रोजी आयपीएलचे अखेरचे साखळी सामना होणार असून अंतिम सामना २६ मे रोजी होणार आहे. भारतीय संघात निवड झालेले काही खेळाडू आयपीएलचे साखळी सामने पूर्ण होताच न्यूयॉर्कला रवाना होतील.
 
आंतरराष्ट्रीय सामन्यांतून प्रमुख खेळाडूंवर येणारा ताण लक्षात घेऊन काही जणांना आलटून पालटून विश्रांती दिली जाते; परंतु आयपीएलमध्ये तसे होणार नाही, याचे संकेत मिळत आहे. आयपीएल संघ फ्रँचाईसचे असल्यामुळे बीसीसीआय त्यांना सूचना करू शकत नाही, असे सांगण्यात आले.
 

Related Articles