मयंक यादवने टाकला आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडू   

लखनऊ : इंडियन प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत ११ वा सामना एकाना क्रिकेट स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात झाला. या सामन्यात लखनऊने २१ धावांनी विजय मिळवला. हा लखनऊचा यंदाच्या हंगामातील पहिलाच विजय आहे. दरम्यान, या सामन्यात लखनौचा वेगवान गोलंदाज मयंक यादवने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने या सामन्यातून पदार्पण करताना त्याच्या वेगवान गोलंदाजीने प्रभावित केले. त्याने या हंगामातील सर्वात वेगवान ताशी १५५.८ किमी वेगाने चेंडूही टाकला.
 
इतकेच नाही, तर २१ वर्षीय मयंकने त्याच्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये सातत्याने ताशी १४० किमी पेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी केली. त्यामुळे त्याचे अनेक दिग्गजांनीही कौतुक केले आहे.दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणार्‍या मयंकने लोकांकडून त्याला मिळणार्‍या गमतीशीर प्रतिक्रियेबद्दलही सांगितले. त्याने सांगितले की त्याला खूप जणांनी सांगितले आहे की तो थोडा सूर्यकुमार यादवसारखा किंवा जसप्रीत बुमरासारखा दिसतो. हे नेहमीच त्याला ऐकायला लागते.
 दरम्यान, मयंकला लखनौने २०२२ च्या लिलावात २० लाखांच्या किंमतीत खरेदी केले होते. पण तो २०२२ मध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही, तर २०२३ आयपीएल हंगामातून तो दुखापतीमुळे बाहेर झाला होता. मात्र अखेर त्याला २०२४ आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. त्याच्या वेगवान गोलंदाजीबद्दल तो म्हणाला, ’वेग हा मला नैसर्गिकरित्या मिळाला आहे. मी कधीही वेगातच गोलंदाजी करायची असा विचार करत नाही, त्यापेक्षा सातत्य राखण्यावर माझा भर असतो. वेग ही माझी ताकद आहे.
 
पहिल्या आयपीएल सामन्याबद्दल मयंक म्हणाला, ’जेव्हा मी मैदानात गेलो, तेव्हा मला जाणवले की ही जागा माझ्यासाठीच आहे. सर्वजण म्हणाले की पहिल्या सामन्यात नर्व्हस व्हायला होतं वैगरे, पण मला फार काही वाटलं नाही. पहिल्या चेंडूनंतर सर्व सामन्यच वाटत होतं. डेल स्टेन, ब्रेट ली यांसारख्या जगभरात नावाजलेल्या वेगवान गोलंदाजांनीही मयंकचे कौतुक केले. याबाबत बोलताना मयंक म्हणाला, ’मी लहानपणापासून या खेळाडूंना टीव्हीवर पाहिले आहे. त्यांच्याकडून कौतुक होणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. माझ्या वडिलांना वेगवान गोलंदाज आवडायचे, ते मला त्यांना दाखवायचे. डेल स्टेन, मॉर्ने मॉर्केल, मिचेल जॉन्सन अशा गोलंदाजांना दाखवायचे.मयंकने असेही सांगितले की जसप्रीत बुमराह त्याचा आदर्श आहे. तो म्हणाला, ’मला बुमराहकडून प्रेरणा मिळते. तो सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. त्याच्याकडून शिकण्याचा मी नेहमीच प्रयत्न करेल. याशिवाय लखनौचा प्रभारी कर्णधार निकोलस पूरननेही मयंकचे कौतुक केले. तसेच त्याने म्हटले त्याचे भविष्य उज्वल आहे
 

Related Articles