‘स्मार्ट सिटी’चे कौतुक आणि कवित्व !   

स्मार्ट सिटी होताना : पुणे : सुरेश कोडितकर 

 
मागील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे आपण आता या लेख मालिकेचा समारोप करण्याच्या अंतरिम पायरीवर आहोत. शहरे स्मार्ट करण्याच्या आणि होण्याच्या विविध आयामांचा आपण या संपूर्ण मालिकेत अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आहे. स्मार्ट सिटीचे आपल्याला कौतुक फार आहे. कारण विदेशातील स्मार्ट सिटीची अनेक चित्रे आपण पाहिली आहेत. त्यावर भरभरून लिहिलेली वर्णने वाचली आहेत. त्याप्रमाणे आपले शहर व्हावे असे प्रत्येकाला वाटते; पण त्यासाठी आपण स्वतः काय करू शकतो, याबद्दल कोणी विचार करायला तयार नाही. सर्व सरकारने करावे किंवा जादूची छडी हलवून पुणे स्मार्ट व्हावे अशी आस लावून सगळे बसले आहेत. सर्व काही परस्पर व्हावे आणि आपल्याला आयते लाभावे ही मानसिकता पुण्याला स्मार्ट करू शकलेली नाही. उलट मला काय त्याचे या मानसिकतेने पुणे बकालपणाच्या सर्व सीमा ओलांडून बसले आहे. स्मार्ट सिटीचे कौतुक फसगत बनून समोर आले आहे आणि कवित्व मूळ पुणे हरवून बसायला कारणीभूत ठरले आहे.

पुणे बकाल झाले

 
आज पुण्यात सायकल नाही, टांगा नाही, बैलगाडी नाही. पादचारी कमी प्रमाणात आहेत. त्यांना चालायला पदपथ नाही. वाट फुटेल तसे ते अगदी रस्त्यांवरूनही चालतात. त्यांचा नाईलाज आहे. पदपथ अतिक्रमणग्रस्त आहे. रस्त्यावर अनधिकृत बांधकाम आणि स्थानिक गुंडांचा कब्जा आहे. पथारी आहे, झोपडी आहे. ठिय्या आहे, इलाखा आहे. अनधिकृत नळ आणि वीज जोड मिळवणे कठीण बाब नाही. कोणी कुठेही तंबू ठोकू शकतो. आपला आसरा तयार करू शकतो. स्वच्छता, सुरक्षा, आरोग्य, खाजगीपणा या बाबी रस्त्यावरील लोकांच्या बाबतीत अशक्य असल्या तरी आता पुणे भकासपासून बकालपणाकडे वेगाने मार्गक्रमण करत आहे. नव्हे त्याचे प्रत्यक्ष पुरावे आपल्या महानगर पुण्यात ठायी ठायी सहज दिसून येत आहेत.
 
पुणे शहर बकाल होत आहे, या आशयाची एक बातमी आपण सर्वांनी केसरीच्या दि. ११ मार्चच्या अंकात वाचली असेलच. पदपथावर तंबू टाकून भटक्यांचा ठिय्या असे उपशीर्षक लाभलेल्या त्या बातमीत पोटार्थी, बिगारी लोकांनी अनेक चौक, रस्त्यांवर, पदपथांवर ताडपत्रीचा तंबू टाकून आपला निवारा उभा केला आहे. ज्यामुळे वाहतूक, पदपथाच्या कडेने चालणारे लोक या सर्वांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अस्वच्छता, अनारोग्य, अपराध, अनाचार यांचे आश्रयस्थान म्हणजे असे छोटे-मोठे तात्पुरते उभारलेले पण कायम असलेले तंबू आहेत. पुणे स्टेशन, मालधक्का रोड, कॅम्प वगैरे भागात या लोकांचे ठिकाण असल्याचे दिसून येते. बाहेरून पुण्यात पोटाची तहानभूक अथवा कायमचे आश्रयस्थान म्हणून पुण्यात येणार्‍या लोकांची संख्या वाढत जाणार आहे, त्याने शहर अधिक घाण, कुरूप, ओंगळवाणे, बेंगरूळ न झाले तर नवलच.
 

पुणे अस्ताव्यस्त!

 
जे रस्त्यांवर बोरी बिस्तरा अंथरून आणि पथारी पसरून शासकीय जागा ताब्यात घेऊन जनतेच्या हाल अपेष्टात भर टाकत आहेत आणि चोरी, वाटमारी, लूट याद्वारे पुणेकरांना त्रास देत आहेत त्यांना पोलिस आणि अतिक्रमण विभागाने धडा शिकवायला हवा. त्या परिसरातील नागरिक आणि इतर यंत्रणांनी तक्रार नोंदवायला हवी. लोकप्रतिनिधींनी अशा बेकायदेशीर कब्ज्याला धुडकावून लावायला हवे, पण हे होत नाही. अशा अनधिकृत वस्त्या वाढत राहतात. शहर घाण, बकाल, गलिच्छ होत राहते. रस्त्यावरील या लोकांच्या वागण्या आणि अनधिकृत कब्ज्याबाबत आपण बोलत असलो तरी जे पांढरपेशी पुणे शहरात येऊन स्थायिक होऊन या शहराला काँक्रिटचे जंगल, समस्यांचे आगार, पायाभूत सेवा सुविधांवर ताण, ग्रामीण भागावर अतिक्रमण, शहरात गर्दी, कोंडी, वाहतूक समस्या निर्माण करत आहेत, त्यांचे काय? त्या निर्वासितांच्या लोंढ्यांना रोखायचे कसे? पुणे क्षेत्रफळाने ताणले, पसरले, खेचले, आणि लांबवले गेले आणि लोकसंख्येने फुगवले गेले ते परजिल्ह्यातील, पुणे जिल्हा सोडून उर्वरित इतर तालुक्यातून आलेल्या लोकांच्यासाठी. पुण्याच्या परिघावरील ग्रामीण भागात लोकांनी शेतजमिनी विकल्या. तिथे इमारती उभ्या राहिल्या. जसे बालाजी नगर, धनकवडी यांचे झाले, तसेच हिंजवडी, मारुंजी, नर्‍हे-आंबेगाव, मांजरी-फुरसुंगी याचे झाले. पुण्याजवळ ही दाटीवाटीची नवी आधुनिक खेडी उभी राहिली. हे आधुनिक बकालपण ठरले. कारण त्यात फक्त जगणे उरले. सत्व हरवले. शहर स्मार्ट नव्हे, पण चकचकीत आपण केले पण ते लाभदायक न ठरता अडचणी आणि समस्यांचा डोंगर झाले. आधुनिकतेचा हव्यास हे आपले कौतुक ठरले आणि जगणे लोप पावत गेले हे आपले कवित्व उरले, हातचे सुख गमावले आणि पळत्याच्या पाठीमागे लागून स्मार्ट काही अखेर लाभले नाही.
 

स्मार्ट पुणे - जादूची कांडी नव्हे !

 
स्मार्ट पुणे आपल्यासाठी सुखद हवामान, स्वच्छ पर्यावरण घेऊन येईल ही अपेक्षा फोल ठरली. दळणवळण गतिमान असेल, लवचिक असेल, वेळ वाचेल, उर्जा ज्वलनशील नसेल, गर्दीचे अचूक दिशादर्शन होईल, आरोग्य, शिक्षण, रोजगार यांचा परिणामकारक व्यवस्था असेल, पाणी पुरवठा, सांडपाणी निर्मूलन, शून्य कचरा याला प्राधान्य असेल. बालक, वृद्ध, महिला यांच्या सुरक्षेत तडजोड नसेल. कायद्याचे राज्य असेल. हे सगळे स्मार्ट पुण्यात लाभेल, असे वाटले होते; पण वाटणे आणि लाभणे हे जुळून आले नाही. आपली मानसिकता, आपली समाज आणि राज्य व्यवस्था यांच्या लेखी स्मार्ट सिटी हा विषय जादूची कांडी फिरवणे असा होता; पण त्याच्या कठोर आव्हानाचा आवाका लक्षात आल्यावर शासन, प्रशासन सारेच दूर झाले आणि आपण उघडे पडलो. कौतुक पुरे झाले आणि कटू वास्तवाने आपल्याला जमिनीवर आणले.
 

प्रचारकी स्मार्टपणा व्यर्थ

 
स्मार्ट सिटी करायची म्हणजे नेमके काय करायचे याचा आराखडा, चित्र, विचार स्पष्ट नसल्याने फक्त प्रचार, प्रसार यापुरतेच आपण मर्यादित राहिलो आहोत. ही एक बाजू झाली. दुसरी ही बाजू आहे की, कदाचित स्मार्ट सिटीचे सर्व विषय समजूनही ते प्रत्यक्षात साकार करणे अवघड आहे, याची कल्पना असल्याने सर्व धुरिणांनी अंग काढून घेतले असावे. कारण अनियंत्रित लोकसंख्या, मर्यादित संसाधने हा प्रश्न होताच. सोबत जनजागृती ही महत्वाची समस्या होतीच. स्मार्ट सिटी ही संकल्पना आपल्या समाजाला झेपणे शक्य नाही. आपल्या समाजात झिरपणे शक्य नाही. अनियंत्रित लोकसंख्या आणि नियंत्रित संसाधने याचा ताळमेळ कुठेच बसत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस जगण्याचा संघर्ष कठीण होत चालला आहे. अशा समाजात स्मार्ट सिटी संकल्पना समजणे, साकार होणे शक्य नाही. मग आपण स्मार्ट सिटीचे कौतुक पुस्तक, बातम्या, क्लिप, व्हिडिओ, परिसंवाद याद्वारे करत राहिलो. ते कौतुक आता आळवण्यात अर्थ नाही.
 

कौतुक, कवित्वातील अंतर ?

 
पुणे स्मार्ट सिटी होताना घडले काहीच नाही. चौक, भिंती रंगवणे आणि विविध रंगीबेरंगी रोपे आणि फुले असलेल्या कुंड्या जागोजागी ठेवण्यात आपण धन्यता मानली. पंचतारांकित हॉटेलांमध्ये स्मार्ट सिटीचे सोहळे झाले. बातम्यांचे मथळे सजले. ग्राउंड झिरोवरील परिस्थिती किंचितही बदलली नाही. स्मार्ट सिटी म्हणजे काय? पुणे स्मार्ट करायचे म्हणजे नेमके काय हे जर पुण्यातील लहानथोर सर्व नागरिकांना माहित नसेल तर ते शासन आणि प्रशासनाचे मोठे अपयश म्हणावे लागेल. अनुत्साह, अज्ञान, अनिच्छा, आव्हान, अवघड या सार्‍या अडथळ्यांना सांभाळणे ही अशक्य कोटीतील बाब आहे. स्मार्ट सिटीचा बट्ट्याबोळ होण्याला कोण जबाबदार आहे?
 

स्मार्ट काम - कसे असावे ?

 
शहर विकासाची कोणतीही नवी संकल्पना ही स्थानिक परिस्थिती पूरक हवी. त्यात लोकसहभाग हवा. वास्तवाचे भान हवे. स्थानिक स्वराज्य संस्थेचा संपूर्ण आणि सक्रीय सहभाग हवा. वास्तवाशी निगडीत समस्या आणि त्यांची वापरकर्ता पूरक उपाय हवेत. असे जोपर्यंत होणार नाही, तोवर कौतुक ते कवित्व हा अपयशाचा फेरा सुरूच राहणार आहे. मुळात स्मार्ट हा मोठा घास घेण्याची काहीच आवश्यकता नव्हती. आपण एक प्रभाग अथवा त्यातील एक वॉर्ड असे काम करू शकत होतो. एक प्रभाग अथवा वॉर्ड जर आपण टप्प्याटप्प्याने स्मार्ट करत गेलो असतो तर आपल्याला त्यातील अडचणी आणि निराकरण हा पट उपलब्ध झाला असता. जनजागरण करणे सोपे, सुलभ झाले असते. एक प्रभाग अथवा वॉर्ड हाताळायला, प्रयोग करायला, प्रतिक्रिया आणि अभिप्राय गोळा करायला सोपा असतो. तिथे काम करून वातावरण निर्मिती झाली असती. प्रसार आणि समाज माध्यमातून चाललेली क्रिया, होणारी प्रक्रिया, आणि होत असलेले परिवर्तन हे दाखवता आले असते; पण हा मार्ग आपण पत्करला नाही. ज्या संकल्पना देशी नाहीत. ज्यात स्थानिक विचारांचा अभाव आहे, अशा गोष्टी आपल्या इथे रुजणार आणि अंकुरणार कशा?
 

अडसर आणि उपाय

 
इंदूर असो वा सुरत, हैदराबाद असो वा नागपूर, जयपूर असो वा कोझिकोडे, पुणे असो वा अहमदाबाद सर्वत्र स्मार्ट सिटीची संकल्पना तीच आहे. मग शहरे स्मार्ट होण्यात अडसर काय आहे. जे काम सुरत किंवा इंदूर या शहरांना जमू शकते ते इतरांना का जमू शकत नाही? प्रश्न आहे मानसिकता, सातत्य आणि चिकाटी, शाश्वत धोरण आणि अंमलबजावणी, तसेच संपूर्ण लोक सहभागाचा. कदाचित इंदूर छोटे शहर असेल. पुण्यासारखे महानगर नसेल; पण म्हणून इंदूरच्या कर्तुत्वाचे मोल कमी होत नाही. आज इंदूर शहराने स्वच्छ शहरांच्या यादीत सातत्याने पहिला क्रमांक मिळवलेला आहे. आपल्या महापालिकांना किमान एक भाग, एक वसाहत तरी स्मार्ट करायचे शिवधनुष्य पेलायला हवे होते. मोठमोठ्या संकल्पना, भरगच्च नावे देऊन साकार आणि यशस्वी होत नाही, हे आपल्याला कधी समजणार?
 

स्मार्ट सिटी - थोडाबहुत अभ्यास!

 
स्मार्ट पुणे हा प्रवास सुरु होण्याऐवजी कौतुक ते कवित्व या टप्प्यात अडकला आहे. आता तर आपण स्मार्ट सिटी प्रकल्प रद्द केला आहे. ते होणार होते. पुणे शहराच्या लादलेल्या महानगरीकरणाचे परिणाम हे पुढील अनेक वर्षे आपल्याला भोगावे लागणार आहेत. शहरे स्मार्ट करताना आधी तेथील लोकांची मानसिकता, समज, विचार, वृत्ती, दृष्टीकोन स्मार्ट होईल असे शिक्षण, प्रशिक्षण, जनजागरण केले पाहिजे. जे गाव करी ते राव न करी. नागरीकरण अनियंत्रित आणि धोरण नियोजनहीन आहे. याचा ताळमेळ घालणे हे अवघड आणि अशक्य काम आहे. शहरे स्मार्ट होवो अथवा न होवो पण माणसांनी स्मार्ट व्हायला हरकत नाही. या लेखमालेच्या निमित्ताने स्मार्ट पुणे या संकल्पनेचा आपण थोडाबहुत अभ्यास केला आहे.

Related Articles