वाचक लिहितात   

निवडणूक आयोगाने बंधने आणावीत!

 
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्याने समस्त राजकीय पक्ष आचारसंहितेचा मान राखून प्रचाराची दिशा ठरवण्याच्या कामाला लागले आहेत. उमेदवाराने निवडणुकीत कसा आणि किती पैसा खर्च करून प्रचार करावा यावर निवडणूक आयोगाचे निर्बंध आहेत; मात्र त्यातून मार्ग कसा काढावा याचे पुरेसे ज्ञानही समस्त पक्षांकडे आहे. निवडणुका जवळ आल्या की, प्रचारासोबतच अन्य पक्षातील मोठे मासे गळाला लावण्यासाठी प्रयत्न करणारा एक स्वतंत्र विभाग प्रत्येक पक्षामध्ये कार्यरत असतो. जनमाणसांमध्ये वजन असलेला आणि आपल्या मतपेटीवर सकारात्मक परिणाम करू शकणारा अन्य पक्षातील दुखावलेला किंवा खिसे भरल्यावर आपल्याकडे येऊ शकणारा नेता हेरून त्यावर सापळा टाकण्यात हा स्वत्रंत विभाग माहीर असतो. प्रमुख पक्षांचे हे स्वतंत्र विभाग देशभरात पूर्ण शक्तीनिशी कार्यरत झाले आहेत, हे प्रतिदिन प्रसिद्ध होणार्‍या पक्षबदलाच्या बातम्यांवरून लक्षात येते. यंदाच्या निवडणुकांत निवडणूक आयोगाने या दोन्ही गोष्टींवर लक्ष ठेवायला हवे!
 

मोक्षदा घाणेकर, काळाचौकी, मुंबई

 

भर उन्हाळ्यात पाऊस!

 
गेले काही दिवस राज्याच्या हवामानात सातत्याने आणि वेगाने बदल होत असल्याने कधी उन्हाचा चटका, कधी गारठा, तर कधी अवकाळी पाऊस आणि गारपीट अशा विभिन्न प्रकारच्या हवामानाला सामोरे जावे लागत आहे. उन्हाच्या सततच्या तीव्र झळांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. कमाल तपमानाचा पारा अनेक ठिकाणी ३७ अंशांपार गेला आहे. काही ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून दुपारच्या सुमारास उन्हाची प्रचंड दाहकता तर सकाळच्या आणि रात्रीच्या वेळी काहीसा गारवा जाणवत आहे. कमाल आणि किमान तपमानातील मोठ्या फरकामुळे अनेकांना सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी अशा आजारांचा त्रास सुरू झाला आहे. दुसरीकडे विदर्भात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने जोरदार तडाखा दिल्यामुळे गहू, चणा, भात इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले. पिकांची दैन्यावस्था बघून शेतकरी हवालदिल झाला आहे. निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे ऋतुचक्रावर परिणाम झाला असून भर उन्हाळ्यात पडणारा पाऊस आणि गारपीट हे त्याचे दृश्य परिणाम आहेत.
 

प्रदीप शंकर मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई

 

अर्थसाह्य त्वरित द्या

 
दरवर्षी केंद्र सरकारकडून राज्यातील दिव्यांग यांना आर्थिक अनुदान व राज्याकडून आर्थिक अनुदान स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ३१ मार्चपूर्वी प्रदान केले जाते. ३१ मार्च २०२४ तोंडावर येऊन ठेपलेली आहे. तरी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था यांनी राज्य व केंद्राकडून आलेले अनुदान दिव्यांगांना त्वरित वाटावे म्हणजे घाई व गडबड होणार नाही. काही स्थानिक स्वराज्य संस्था पालिका, नगरपालिका, नगर पंचायत त्यांच्यातर्फे ही काही अनुदान विशेष सहाय्य निधीतून देते तेही या दिव्यांग व्यक्तींना देऊन त्यांच्या जीवनात आनंद पेरावा, अशी विनंती आहे.
 

धोंडीरामसिंह राजपूत, वैजापूर

 

भारतात प्रजनन दर घसरला 

 
आज भारत लोकसंख्येच्या बाबतीत जगात पहिला आहे. गेले कित्येक दिवस जगात लोकसंख्येच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर असलेल्या चीनला त्यांनी मागे टाकले आहे. असे जरी असले तरीही भारताचा प्रजनन दर घसरला आहे. कोणत्याही देशाची लोकसंख्या कायम राहण्यासाठी प्रजनन दर २.१ असणे आवश्यक आहे. या दराला रिप्लेसमेंट दर असे म्हटले जाते. प्रजनन दर यापेक्षा कमी झाल्यास लोकसंख्या कमी होऊ शकते. जगभरातसुद्धा हीच परिस्थिती दिसत आहे. आज तरी भारत तरुणांचा देश म्हणून जगात ओळखला जातो. आज देशात वयोवृद्ध लोकांची संख्या वाढती आहे. त्यांना योग्य त्या सुविधा पुरविणे जरुरीचे आहे. दर जरी घसरला तरीही अनेक नवीन समस्या पैदा होत आहेत. त्यांना आपणास सामोरे जावे लागेल.
 

शांताराम वाघ, पुणे 

 

अनिष्ट प्रथा टाळाव्यात

 
सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. लग्नात कोणी आणि किती पैसा खर्च करायचा,  हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे; परंतु वाईट एकाच गोष्टीचे वाटते की, या लग्नात अनेक गोष्टींची उधळपट्टी केली जाते. अनेक गोष्टी वाया जातात. लग्नात अजूनही अक्षता म्हणून, सर्रास तांदूळ वापरले जातात. नंतर हे तांदूळ अक्षरशः पायदळी तुडवले जातात, ते पाहून वाईट वाटते. तांदळाऐवजी काही ठिकाणी फुलांच्या पाकळ्या वापरल्या जातात, हे सर्वात उत्तम. याचे कारण या पाकळ्यांचा आपण खत म्हणून सुद्धा वापर करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे, काही ठिकाणी जेवणाची पंगत असते. तर काही ठिकाणी बुफे हा प्रकार असतो. या ठिकाणी एक सूचना करावीशी वाटते की, जेवणाची  पंगत जर असेल तर, जेवणार्‍यांना अजिबात आग्रह करू नये. जर एखाद्या पदार्थाचा आग्रह केला तर, तो पदार्थ जास्त झाल्यामुळे, पानात तसेच टाकला जातो. त्याचप्रमाणे बुफेमध्ये जेव्हा पदार्थ तिथे ठेवलेल्या माणसांकडून वाढले जातात, किंवा स्वतःच्या हाताने वाढून घेण्याची पद्धत असते, ती सर्वात चांगली. त्यावेळेस आपल्याला झेपेल तेवढेच पानात घ्यावे. नाहीतर यात सुद्धा वाजवीपेक्षा जास्त अन्न पानात घेतल्यामुळे अक्षरशः बरेचसे अन्न वाया जाते. हे पाहून वाईट वाटते. 
 

गुरुनाथ वसंत मराठे, बोरिवली(पूर्व), मुंबई 

Related Articles