कप्तानांची प्रयोगशाळा   

मिडविकेट : कौस्तुभ चाटे

‘आयपीएल’च्या नव्या हंगामाची सुरुवात तशी नेहेमीसारखीच झाली. म्हणजे नेहेमीचे वाद विवाद, दोन संघांच्या पाठिराख्यांमधील शाब्दिक युद्ध, विराटच्या पाठीराख्यांनी धोनीच्या नावाने शिमगा करायचा आणि रोहितच्या पाठीराख्यांनी विराटच्या नावाने. (इथे खेळाडू नाही तर शिमगा महत्वाचा. सगळे खेळाडू अगदी व्यवसायिकपणा दाखवून असले तरी त्यांचे पंखे मात्र त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरायला तयार). गुजरातच्या (आणि मुंबईच्या देखील) पाठीराख्यांना हार्दिक मुंबईकडे आलेला सलणार अशा गोष्टी आहेतच. त्यात नेहेमीप्रमाणे मुंबई विरुद्ध चेन्नई, कोलकाता विरुद्ध दिल्ली, अमुक संघ विरुद्ध तमुक संघ असे वाद आहेतच. त्याच वादात भर टाकायला टीव्हीवर सुरु झालेल्या जाहिरातींच्या मोहिमा देखील आहेत. एकूणच पुढचे दोन महिने हे क्रिकेट नसून युद्ध आहे असे काहीसे बिंबवले जाणार हे नक्की.

पण या सगळ्या गदारोळात एक गोष्ट चांगली घडते आहे ती म्हणजे नवीन दमाच्या खेळाडूंवर आणि कर्णधारांवर निर्माण होत असलेला विश्वास. स्पर्धा सुरु होण्याच्या एकच दिवस आधी धोनीने चेन्नई संघाचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाडच्या हाती सोपवलं. त्याआधी केवळ व्यावसायिक कारणांमुळे हार्दिक पंड्या गुजरातकडून मुंबईकडे आला आणि त्याने रोहितला कर्णधारपदावरून बाजूला केलं. गुजरात संघाचे कर्णधारपद ताज्या दमाच्या शुभमन गिलकडे आलं तर एक वर्षाच्या कालावधीनंतर परत एकदा दिल्ली संघाची जबाबदारी ऋषभ पंतकडे आली.

यावर्षीची आयपीएल स्पर्धा म्हणजे भारतीय क्रिकेटमधील नवीन युगाची सुरुवात म्हणावी लागेल. धोनी, रोहित आणि कोहलीची पिढी जाऊन आता एखाद-दोन वर्षांत नवीन पिढी तयार होईल. धोनीने तसेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेऊन बरीच वर्षे झाली आहेत. केवळ काही गोष्टींच्या मोहापायी (त्यामध्ये फॅन फॉलोईंग हे मोठं कारण) तो चेन्नई साठी खेळताना दिसतो. मागच्याच वर्षी त्याने कर्णधारपदाला रामराम केला होता, पण तो प्रयोग यशस्वी ठरला नाही, आणि त्याचा आयपीएल मधील प्रवास अजून लांबला. यावर्षी त्याने सुरुवातीलाच ऋतुराजकडे कर्णधारपद सोपवलं आहे. हा प्रयोग यशस्वी व्हावा अशी त्याची मनोमन इच्छा असेल. तसे झाल्यास पुढील काही काळापर्यंत चेन्नईला ऋतुराज सारखा कप्तान लाभेल आणि हळूहळू त्यांना त्याभोवती संघबांधणी करता येईल.
ऋतुराजला कर्णधारपदाचा थोडा अनुभव नक्की आहे. महाराष्ट्रासाठी त्याने कर्णधारपद भूषवले आहे. तसेच मागच्यावर्षी झालेल्या आशियाई खेळांमध्ये देखील तो भारतीय संघाचा कप्तान होता. त्या स्पर्धेत भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकले होते. त्याच सुमारास झालेल्या विश्वचषक स्पर्धेमुळे आशियाई खेळांचे ते सुवर्णपदक काहीसे झाकोळले गेले असले तरी ऋतुराजच्या त्या संघाचे कौतुक निश्चित केले पाहिजे. ऋतुराज धोनी सारखाच शांत डोक्याचा आहे, आणि त्याची निर्णयक्षमता देखील अचूक आहे. आता या मोठ्या स्पर्धेत कप्तान म्हणून तो कशी कामगिरी करतो हे बघणे महत्वाचे ठरेल. हार्दिक पंड्या खरे म्हणजे मुंबई इंडियन्सचा प्रमुख खेळाडू. दोन वर्षांपूर्वी गुजरात टायटन्स हा संघ आयपीएलमध्ये दाखल झाला आणि मूळच्या गुजराती पंड्याने त्या संघाचा रस्ता पकडला. पहिल्याच वर्षी त्याने गुजरात टायटन्सला आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले, मागच्या वर्षी त्यांचा संघ उपविजेता होता. अशावेळी पंड्याच्या अष्टपैलूत्वाचे आणि कप्तानीचे मोठे कौतुक झाले. कपिल देव नंतर आपल्याला लाभलेला सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू या शब्दात माध्यमांनी त्याला हरभ्भर्‍याच्या झाडावर बसवले देखील. पण या वर्षी आयपीएलमध्ये (काही चमत्कार करून) तो अचानक परत आपल्या जुन्या संघामध्ये - मुंबई इंडियन्स मध्ये दाखल झाला. तो नुसताच संघात आला नाही तर रोहित शर्मा सारख्या मातबर खेळाडूला दूर सारून तो संघाचा कर्णधार देखील झाला.

अर्थातच ही गोष्ट अनेक रोहित समर्थकांना रुचणारी नव्हती. मुंबईच्या संघात रोहितबरोबरच भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवलेला जसप्रीत बुमरा आणि सूर्यकुमार यादव देखील होता. पण या दोघांनाही डावलून पांड्याकडे कर्णधारपद देण्यात आले. हार्दिकला कर्णधारपदाची अनुभव निश्चित आहे. त्याने यापूर्वी देखील आयपीएलमध्ये, तसेच भारतीय संघाचे देखील कर्णधारपद भूषवले आहे. हार्दिक पंड्या अष्टपैलू खेळाडू म्हणून निश्चितच उपयुक्त आहे, पण त्याच्या मैदानावरील आणि बाहेरील वागण्याने तो अनेकदा रागाचा बळी ठरतो. त्याचे वागणे अनेकदा उद्दामपणाकडे झुकते. आणि अशावेळी क्रिकेटरसिक मात्र नक्कीच दुखावला जातो. धोनी, विराट, रोहित यांची रसिकांच्या मनात एक वेगळी जागा आहे. त्याला काही विचित्र पद्धतीने धक्का देणे क्रिकेट रसिकांना रुचणारे नाही. अर्थात कप्तानासाठी आणि खेळाडूसाठी मैदानावरील कामगिरी जास्त महत्वाची आहे. या सीझनमध्ये रोहित, बुमरा किंवा सूर्या सारख्या दिग्गज खेळाडूंना एकत्र घेत तो मुंबई इंडियन्सची नौका पार करतो का ते येणार काळच सांगेल.

हार्दिक पंड्या मुंबईकडे गेल्याने गुजरात टायटन्सची कर्णधारपदाची जागा रिकामी होती. आपसूकच ती माळ शुभमन गिलच्या गळ्यात पडली. आता शुभमनने फारसे कधी कर्णधारपद भूषवले नसले तरी तो एक चांगला खेळाडू आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत त्याने आयपीएलमध्ये आणि भारतीय संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. या घडीचा एक उत्तम फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वय देखील त्याच्या पाठीशी आहे. त्याच्यासमोर मोठी क्रिकेट कारकीर्द आहे. अशावेळी तो आपल्या संघासाठी मोठी भूमिका बजावू शकतो. संघातील इतर युवा खेळाडूंना एकत्र घेऊन तो गुजरात टायटन्सच्या संघाला पुन्हा एकदा ’प्ले-ऑफ’ मध्ये नेण्यात यशस्वी ठरला तर येणार्‍या काळात त्याच्यासाठी भारतीय संघाची कप्तानी देखील दूर असणार नाही.
गेल्यावर्षी महत्वाचे दोन  खेळाडू आयपीएलसारख्या स्पर्धेपासून लांब होते. ऋषभ पंत त्याच्या दुर्दैवी अपघातानंतर यावर्षी परतला आहे. अपघात होण्याच्या आधी काही वर्षे तो भारतीय संघाचा आणि आयपीएल मधील त्याच्या दिल्ली संघाचा महत्वाचा भाग होता. एक तडाखेबंद यष्टीरक्षक-फलंदाज अशी त्याची प्रतिमा त्याच्या कर्णधारपदाला सहाय्यच करते. त्याने दिल्ली रणजी संघाचे देखील कर्णधारपद भूषवले आहे. यावर्षी तो परत आल्यानंतर त्याचा संघ कशी कामगिरी करतो ते बघणे आवश्यक आहे. अर्थात भारतीय संघातील त्याची जागा आता गृहित धरता येणार नाही. ती जागा परत मिळवण्यासाठी त्याला नक्कीच कष्ट करावे लागणार आहेत.

पंत प्रमाणेच कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यर देखील दुखापतींमधून परतला आहे. गेल्या वर्षी तो देखील आयपीएल मध्ये नव्हता त्यामुळे त्याची वैयक्तिक आणि कप्तान म्हणून संघाची कामगिरी कशी होते याकडे देखील लक्ष असेल. याखेरीज संजू सॅमसन आणि के एल राहुल सारखे आयपीएल संघांचे कप्तान देखील आहेतच. एकूणच स्पर्धेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर हे सर्वच खेळाडू कप्तान म्हणून किती यशस्वी ठरतात हे बघावे लागेल. आयपीएल स्पर्धेचे हे आता सतरावे वर्ष आहे. कोणी कितीही आगपाखड केली तरी आता या स्पर्धेचे महत्त्व कमी होणार नाही. त्यामुळे या स्पर्धेतून भारतीय क्रिकेटला काय मिळाले आहे, किंवा मिळू शकते याकडे लक्ष देणे जास्त महत्वाचे आहे. या स्पर्धेने अनेक उत्तमोत्तम खेळाडू दिले, भारतीय क्रिकेटमध्ये पैसे आणले, भारतीय खेळाडूंना ’अरे ला कारे’ करायला शिकवले हे कोणीच नाकारू शकणार नाही.

आता त्यापुढे जाऊन विचार करायचा झाल्यास आयपीएल ही भारतीय कप्तानांसाठी प्रयोगशाळा ठरू शकते असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आता हळूहळू नवीन पिढीकडे भारतीय क्रिकेटची सूत्रे जाताना दिसत आहेत. त्यामुळे या नवीन पिढीचे, नव्या दमाचे खेळाडू आणि कर्णधार तितकेच महत्वाचे ठरणार आहेत. आयपीएलमध्ये संघ कोणताही जिंको, भारतीय खेळाडू आणि कर्णधार तावून, सुलाखून निघावेत अशीच भारतीय क्रिकेटप्रेमींची इच्छा असेल.  

 

Related Articles