भाजपने नाकारलेला ‘वरूण’!   

चर्चेतील चेहरे : वरूण गांधी

राजकारणात सारेच अस्थिर असते. पण ती अस्थिरता आपल्या भूमिकांनी आपल्याच वाट्याला आणणारे कमी जण असतात. वरुण गांधी अशा काही जणांपैकी एक. पिलिभीत लोकसभा मतदारसंघातून त्यांना भाजपने यंदा उमेदवारी नाकारली आहे. यात धक्कादायक असे काही नाही. आपल्या विधानांनी गांधी यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची अप्रीती गेला काही काळ ओढवून घेतली होतीच. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली असती तर तो धक्का ठरला असता. आता वरुण यांची पुढची खेळी काय असेल हे पाहणे औत्सुक्याचे. ते अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार की समाजवादी पक्ष त्यांना उमेदवारी देणार हे लवकरच समजेल. पण वयाच्या चाळीशीत असणारे वरुण यांचा हा राजकीय अस्त आहे असे मानणे तूर्तास तरी घाईचे ठरेल.

खरे तर गांधी कुटुंब आणि काँग्रेस हे घट्ट समीकरण. परंतु इंदिरा गांधी यांचे धाकटे चिरंजीव संजय यांचा १९८० साली विमान अपघातात मृत्यू झाल्यांनतर संजय यांची पत्नी मेनका यांचे इंदिरा गांधी यांच्याशी संबंध बिघडले. त्यामुळे त्या इंदिरा गांधी यांच्या घरातून बाहेर पडल्या. त्यांचा राजकीय प्रवास हा नंतर बिगर-काँग्रेस पक्षांच्या माध्यमातूनच होत राहिला. वरुण यांना तेच बाळकडू मिळाले. दिल्ली आणि नंतर लंडन मध्ये शिक्षण झालेल्या वरुण यांचा राजकारणाशी संबंध येणे स्वाभाविकच होते  नेहरू-गांधी कुटुंबाच्या अनेक पिढ्या राजकारणात; शिवाय वरुण यांच्या मातोश्री ,मेनका याही राजकारणात सक्रिय. तेंव्हा वरुण त्याच क्षेत्रात आले यात नवल नाही. या क्षेत्राचा परिचय त्यांना मेनका यांनीच करून दिला. त्या  पिलिभीत मतदारसंघातून निवडणूक लढवत होत्या; तेंव्हा त्यांच्या प्रचारात वरुण सहभागी झाले होते. मेनका आणि वरुण यांनी २००४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.

वरुण हे लेखक-कवीही आहेत. वयाच्या विशीत असताना वरुण यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला. त्या कवितांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले तसेच भाजप नेते अटल बिहारी वाजपेयी, लाल कृष्ण अडवानी आणि प्रमोद महाजन यांचेही वेधून घेतले. या तरुणात चमक आहे आणि त्याचा लाभ राजकारणात करून घेता येईल हे या नेत्यांनी हेरले. वरुण यांच्या राजकीय उत्कर्षाला त्यावेळीच एका अर्थाने सुरुवात झाली असे म्हटले पाहिजे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत वरुण यांना भाजपने पिलिभीत मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यांना इतकी भरभरून मते मिळाली की तेथून निवडणूक लढवत असणार्‍या जवळपास सर्व प्रतिस्पर्धी उमेदवारांची अनामत रक्कम देखील जप्त झाली; तब्बल तीन लाखांच्या मताधिक्याने वरुण विजयी झाले होते. तथापि याच प्रचारादरम्यान त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे त्यांच्यावर तत्कालीन मायावती सरकारने राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. वरुण यांची रवानगी इटा कारागृहात करण्यात आली. एकोणीस दिवस तुरुंगात काढल्यानंतर त्यांना जामीन मिळाला आणि त्यांनी बाहेर येऊन उमेदवारी अर्ज भरला आणि प्रचार केला. सर्वोच्च न्यायालयाने वरुण यांच्यावरील राष्ट्रीय सुरक्षा कायद्याची कलमे काढून घेण्याचे निर्देश दिल्याने वरुण यांना दिलासा मिळाला. २०१३ मध्ये एका स्थानिक न्यायालयाने वरुण यांना निर्दोष घोषित केले.

मात्र त्यानंतरही परखड पण काहीदा वादग्रस्त विधाने करणे वरुण यांना टाळता आले नाही. त्याची किंमत त्यांना मोजावी लागली कारण त्यांतील अनेक विधाने आपल्याच पक्ष नेतृत्वाला अडचणीत आणणारी देखील होती. २०१४ च्या निवडणुकीत वरुण सुलतानपूर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी झाले तर २०१९ मध्ये पुन्हा पिलिभीतमधून त्यांनी विजय मिळविला. भाजपचे अध्यक्षपद राजनाथ सिंग यांच्याकडे असताना वरुण यांचा पक्षातील आलेख वेगाने चढता राहिला. त्यांना २०१३ मध्ये पक्षाच्या सरचिटणीसपदी नेमण्यात आले. भाजप पक्ष संघटनेत या पदाचे महत्व आणि त्यावेळी वरुण यांचे केवळ ३३ वर्षांचे वय हे दोन्ही लक्षात घेतले तर ही उडी किती मोठी होती याची कल्पना येऊ शकेल.आपली लोकप्रियता आणि आपली कारकीर्द कायम ठेवण्यात जरी वरुण यांना यश आले असले तरी नाव ’वरुण’ असूनही राजकीय हवेची दिशा त्यांना ओळखता आली नाही हे मात्र आश्चर्यकारक आहे,भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि जनलोकपाल कायद्यासाठी अण्णा हजारे यांनी दिल्लीत आंदोलन करण्याचे निश्चित केले होते. तेंव्हा तत्कालीन सरकारने सुरुवातीस हजारे यांना परवानगी नाकारली; त्यावेळी हजारे यांनी आंदोलनासाठी आपले दिल्लीतील निवासस्थान वापरावे अशी तयारी वरुण यांनी दर्शविली होती. खरे म्हणजे त्यांची ही भूमिका भाजपला अनुकूल. त्यातच गांधी कुटुंबातीलच सदस्य काँग्रेसच्या विरोधात शड्डू ठोकत असल्याने भाजप नेतृत्वाला आनंद होणे स्वाभाविक. त्यावेळी ते खासदार असले तरी पक्ष संघटनेत त्यांना उच्च स्थान त्यांनंतरच मिळाले. राजनाथ यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आपला उत्कर्ष होतो आहे याची जाणीव ठेवून त्यांनी बदलत्या वार्‍यांची दखल न घेण्याची चूक केली.

२०१३ मध्ये भाजपमध्ये नरेंद्र मोदी यांचा विचार पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून सुरु झाला होता. असे असतानाही वरुण यांनी राजनाथ सिंग यांची तुलना अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी करून अप्रत्यक्षपणे तेच पंतप्रधानपदाचा योग्य चेहरा असल्याचे सूचित केले. फेब्रुवारी २०१४ मध्ये मोदींची प्रचार सभा कोलकाता येथे झाली आणि त्या सभेला दोन लाख लोक उपस्थित होते असे माध्यमे सांगत होती. वरुण यांनी मात्र केवळ पन्नास हजार जण उपस्थित होते असा दावा करून माध्यमांनी तयार केलेला फुगा फोडला. पण त्यामुळेच मोदी आणि त्यांचे निकटवर्तीय अमित शहा यांचा रोष ओढवून घेण्यास वरुण यांनी सुरुवात केली होती.
२०१४ मध्ये मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आले.पक्षाच्या  अध्यक्षपदाची धुरा अमित शहा यांच्याकडे गेली आणि पक्षात वरुण यांच्या महत्त्वाला उतरती कळा लागली. आपल्या गफलतींचे राजकीय हिशेब पक्षाचे नवे नेतृत्व लगेचच चुकते करू लागेल अशी मात्र कल्पना त्यांनी केली नसेल. पण मोदी सत्तेत आल्यानंतर काहीच महिन्यांत वरुण यांना सरचिटणीसपदाला मुकावे लागले; पश्चिम बंगालचे प्रभारी पदही त्यांच्याकडून काढून घेण्यात आले.
२०१७ मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार होत्या. वरुण यांनी आपली प्रतिमा कट्टर हिंदुत्ववादी नेता अशी तयार केली होती. २०१६ मध्ये प्रयागराज येथे पक्षाच्या झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे निमित्त साधून वरुण यांनी मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन केले. शहरभर फलक लावून त्यावर मोदी, शहा यांच्याबरोबर आपले छायाचित्र झळकावले. एका अर्थाने आपणच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असे स्वरूप त्यांनी त्या सगळ्या मोहिमेस दिले. हे सगळे पक्ष नेतृत्वाला पसंत पडणे शक्यच नव्हते.करोना काळात उत्तर प्रदेशात लावण्यात आलेल्या रात्रीच्या संचारबंदीचा मुद्दा असो किंवा लखीमपूर खेरी येथे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या ताफ्यातील वाहने शेतकरी आंदोलकांमध्ये घुसविण्याची घटना असो; वरुण यांनी सातत्याने भाजप सरकारला लक्ष्य केले.

अमित शहा यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात वरुण यांना २०१९ मध्ये पुन्हा लोकसभेची उमेदवारी जरी मिळाली तरी जे पी नड्डा अध्यक्ष झाल्यांनतर राष्ट्रीय कार्यकारिणीतून वरुण यांना डच्चू देण्यात आला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अमेठीतील संजय गांधी रुग्णालयात एका बावीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्यांनतर रुग्णालयाचा दाखला उत्तर प्रदेश सरकारने रद्द केला तेंव्हाही वरुण यांनी आक्षेप घेतला होता. दाखला रद्द करून ग्रामीण भागांतील असंख्य रुग्णांची गैरसोय होत असल्याचा आरोप करतानाच केवळ रुग्णालयाच्या ’नावामुळे’ तर ही कारवाई झाली नाही ना असा रोखठोक सवालही त्यांनी विचारला. वरूण यांच्या वारंवारच्या स्पष्टवक्तेपणाच्या प्रयोगांमुळे पक्ष त्यांच्यावर नाराज होताच. त्या नाराजीचेच प्रतिबिंब पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारण्यात पडले आहे. वरुण यांनी आजवर कवितालेखन आणि अन्य अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. ’स्टिलनेस, ’दि अदरनेस ऑफ सेल्फ’ हे त्यांचे कविता संग्रह; तर ’ए रूरल मॅनिफेस्टो’ आणि ’दि इंडियन मेट्रोपॉलिस’ही त्यांची संशोधनात्मक लेखन असणारी पुस्तके. त्यांच्या कवितासंग्रहातील एका कवितेचे शीर्षक ’कंट्रोल’ असे आहे तर अन्य एका कवितेचे शीर्षक ’होप’ असे आहे. आपल्याच कवितांची शीर्षके आत्मसात करून वरुण गांधी यांनी आपल्या जिभेवर आणि भूमिकांवर काहीसे नियंत्रण (कंट्रोल) ठेवले तर त्यांना यापुढेही राजकीय घोडदौडीची आशा (होप) अवश्य ठेवता येईल.

 

Related Articles