पाकिस्तानात शरीफांची घराणेशाही : झरदारी   

मुलगी असिफांच्या बिनविरोध निवडीसाठी आटापिटा

लाहोर : पाकिस्तानातील राजकारणात नवाझ शरीफ यांच्या घराण्याची मक्तेदारी असून देशात घराणेशाही सुरू असल्याची टीका अध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी शनिवारी केली आहे.पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) पक्षाचे सवेसर्वा नवाझ शरीफ राजकारणात आहेत. त्यांची मुलगी मरियम पंजाबच्या मुख्यमंत्री असून बंधू शहाबाझ शरीफ पंतप्रधान आहेत. त्यांचा मुलगा हामजा शहाबाझ शरीफ खासदार आहे.  एकंदरीत पाकिस्तानात शरीफ यांची घराणेशाही सुरू आहे, असा आरोप झरदारी यांनी केला आहे.

झरदारी यांची मुलगी असिफा पोटनिवडणूक लढवत आहे. तिची निवड बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा झरदारी यांची आहे. असिफाला त्यांनी नुकतीच देशाची पहिली महिला असा मानही दिला आहे. त्या सिंध प्रांतातील शहीद बेनझिराबाद मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवत आहेत. झरदारी यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर तेथे पोटनिवडणूक घेतली जात आहे. त्यामुळे त्या बिनविरोध निवडून याव्यात, असा त्यांचा आग्रह आहे. असिफा आणि तीन उमेदवार रिंगणात आहेत. प्रतिस्पर्धी तीन उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

झरदारी स्वत:ची घराणेशाही विसरले

झरदारी यांचीही घराणेशाही देशात सुरू आहे. झरदारी कुटुंबातील सहा जण लोकप्रतिनिधी आहेत. झरदारी देशाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा मुलगा बिलावल आणि मेव्हणा मुन्वर अली टालपूर हे खासदार आहेत. मुन्वर यांच्या दोन बहिणी अनुक्रमे फ्रयाल आणि आझरा सिंध प्रांतातून निवडून आल्या आहेत.

 

Related Articles