न्यूजक्लिक प्रकरणात आरोपपत्र   

नवी दिल्ली : न्यूजक्लिक प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने शनिवारी आरोपपत्र दाखल केले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश हरदीप कौर यांच्या न्यायालयात आठ हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यावर, १६ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. विशेष सरकारी वकील अखंड प्रताप सिंग आणि सूरज राठी यांनी ही माहिती दिली.

पहिले आरोपपत्र गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये दाखल करण्यात आले होते.  या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने १७ ऑगस्ट २०२३ रोजी आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) न्यूजक्लिकचे संस्थापक आणि संपादक प्रबीर पुरकायस्थ आणि एच.आर. प्रमुख अमित चक्रवर्ती यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला होता. त्यानंतर, ३ ऑक्टोबर २०२३ रोजी त्यांना अटक करण्यात आली होती. भारताच्या सार्वभौमत्वाला बाधा आणण्यासाठी आणि चीनच्या समर्थनार्थ प्रचारासाठी पैसे घेतल्याचा या दोघांवर आरोप ठेवण्यात आला होता. पुरकायस्थ सध्या न्यायालीन कोठडीत आहेत. तर, चक्रवर्ती सरकारी साक्षीदार बनले.

या दोघांसह अन्य काही संशयितांच्या दिल्लीतील ८८ आणि अन्य राज्यांतील ७ ठिकाणी तपास यंत्रणांनी छापे घातले आहेत.न्यूजक्लिकच्या कार्यालयातून आणि न्यूजक्लिकच्या काही पत्रकारांच्या निवासस्थानातून जवळपास ३०० इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली होती. यासोबतच, दिल्ली आणि एनसीआरमधील विशेष पथकाने  नऊ महिला पत्रकारांसह ४६ जणांची चौकशी केली आहे.

 

Related Articles