‘आप’ नेते कैलाश गेहलोत ईडीसमोर हजर   

नवी दिल्ली : दिल्लीचे मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते कैलाश गहलोत शनिवारी सक्तवसुली संचालनालयासमोर हजर झाले. उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित आर्थिक अफरातफर प्रकरणात ईडीने त्यांना समन्स बजावले होते.

गेहलोत हे नजफड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारमध्ये ते परिवहन मंत्री आहेत.  याच प्रकरणात मुख्यमंत्री केजरीवाल यांना ईडीने नुकतीच अटक केली आहे. केजरीवाल सध्या ईडी कोठडीत आहेत. माजी उपमुख्यमंत्री आणि आप नेते मनीष सिसोदिया, राज्यसभा सदस्य संजय सिंग, भारत राष्ट्र समितीच्या (बीआरए) नेत्या आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता यांनादेखील ईडीने याच प्रकरणात अटक केली आहे. ईडीच्या समन्सनुसार गेहलोत काल सकाळी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात हजर झाले. या ठिकाणी ईडीचे अधिकारी आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यातंर्गत त्यांचा जबाब नोंदवून घेतला.

२०२१-२२ मध्ये केजरीवाल सरकारने मद्य धोरण आणले होते. भाजपच्या तक्रारीवरुन नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी केंद्रीय गुप्तचर विभागामार्फत (सीबीआय) चौकशीची शिफारस केली होती. त्यानंतर, ईडीने पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तर , केजरीवाल सरकारने हे धोरण रद्द केले होते. या प्रकरणात अटकेत असलेले आपचे माध्यम प्रमुख विजय नायर हे गेहलोत यांना दिलेल्या सरकारी बंगल्यात राहत होते. सरकारी निवासस्थानाचा हा गैरवापर असल्याचे ईडीने म्हटले होते. या प्रकरणात २९२२ मध्ये ईडीने गुन्हा दाखल केला. तर, आतापर्यंत देशभरात २४५ ठिकाणांवर ईडीने छापे घातले आहेत.

 

Related Articles