बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार   

नणंद-भावजयींमध्ये सामना

मुंबई,  (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने शनिवारी सुप्रिया सुळे यांच्यासह पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने बारामतीतून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली. यामुळे बारामतीत आता नणंद-भावजय यांच्यात सामना होणार आहे. शरद पवार गटाने निलेश लंके (नगर), अमर काळे (वर्धा), अमोल कोल्हे (शिरूर), भास्कर भगरे (दिंडोरी) यांचीही उमेदवारी जाहीर केली आहे. तर अजित पवार गटाने रासप नेते महादेव जानकर यांना परभणीची जागा सोडली आहे.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सुरुवातीला दोन गट वेगळे झाले तरी पवार कुटुंबात दरी येणार नाही, असे सांगितले जात होते. परंतु, राजकारण तापत गेले व पवार कुटुंबही दुभंगले आहे. त्यातच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीत आपल्या नणंद सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे सूतोवाच झाले आणि तणाव वाढला. कुटुंबातील काही मंडळी हा थेट संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यात यश आले नाही व शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार बारामतीतून निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. शरद पवार यांच्याबरोबरच, अजित पवार आणि महायुतीसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची असणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूकडून येथे सगळी शक्ती पणाला लावली जाणार हे उघड आहे. परिणामी बारामतीतील पवार विरुद्ध पवार निवडणुकीकडे देशभराचे लक्ष असणार आहे.

पवार गटाची पहिली यादी जाहीर

राष्ट्रवादीच्या शरद पवार  गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लोकसभा उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. या यादीत  बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुरमधून अमोल कोल्हे यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात आली. वर्धा मतदारसंघातून अमर काळे आणि दिंडोरीतून भास्कर भगरे, तसेच नगरमधून निलेश लंके यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. इतर मतदारसंघातील उमदेवारांच्या नावाची देखील लवकर घोषणा करण्यात येईल, असे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. पहिल्या यादीत केवळ  बीड, रावेर, माढा, सातारा आणि भिवंडी येथील उमेदवार जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे यात आणखी काही अदलाबदल होणार का? अशी शंका व्यक्त केली जात आहे.

जानकर परभणीतून

भाजपने दुर्लक्ष केल्यामुळे दुखावलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर शरद पवार यांना भेटले होते. माढ्यातून भाजपच्या रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात महादेव जानकर यांना उतरवले जाणार अशी चर्चा होती. परंतु, त्यांनी पुन्हा ‘यू टर्न’ घेतला व महायुतीत परतले. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मिळालेली परभणीची जागा सोडण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादीच्या कोट्यातून परभणीची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला देण्याचा निर्णय आम्ही घेतला असून,  जानकर हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील, अशी घोषणा केली. त्यामुळे आता परभणीत ठाकरे गटाचे संजय जाधव आणि जानकरांची लढत  होणार आहे.

 

Related Articles