शिवराज पाटील यांच्या सुनेचा भाजपमध्ये प्रवेश   

मुंबई : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांची सून अर्चना पाटील यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अर्चना पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यापाठोपाठ आता अर्चना पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शिवराज पाटील हे मराठवाड्यातील लातूरचे. यूपीए-१ सरकारच्या काळात ते केंद्रीय गृहमंत्री होते. मात्र, २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी हे पद सोडले. त्याआधी त्यांनी लोकसभा अध्यक्षपदही भूषवले होते. अर्चना पाटील सामाजिक कार्याशी जोडल्या आहेत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने लातूर आणि मराठवाड्यात पक्षाला मदत होईल, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

Related Articles