कर्नाटकात भाजप नेत्या तेजस्विनी गौडा काँग्रेसमध्ये   

नवी दिल्ली : कर्नाटकातील आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर भाजप नेत्या तेजस्विनी गौडा यांनी शनिवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपचा राज्यघटना आणि लोकशाीवर विश्वान नाही, असा आरोप गौडा यांनी यावेळी केला.२००४ ते २००९ या कालावधीत काँग्रेस पक्षाच्या खासदार राहिलेल्या गौडा यांनी २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. स्वगृही परतल्याचा मला आनंद असल्याची प्रतिक्रिया गौडा यांनी दिली.काँग्रेस मुख्यालयात पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश आणि प्रसार माध्यम आणि प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेरा यांच्या उपस्थितीत गौडा यांचा पक्षप्रवेश पार पडला. कर्नाटकच्या राजकारणातील सक्रिय नेत्या तेजस्विनी गौडा यांचे आम्ही काँग्रेसमध्ये स्वागत करतो. येत्या निवडणुकीत गौडा सक्रिय राहतील, याचा आम्हास पूर्व विश्वास आहे, असे काँग्रेस नेते रमेश यांनी सांगितले.

तेजस्विनी २००४ ते २००९ दरम्यान काँग्रेसच्या खासदार होत्या. त्यावेळी विविध मुद्द्यांवर आम्ही आवाज उठवला आहे. त्या काँग्रेसमध्ये परतल्याचा आनंद आहे, असेही रमेश म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील २८ पैकी २३ जागा काँग्रेस जिंकेल, असा विश्वास गौडा यांनी व्यक्त केला. २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गौडा २०१८ मध्ये आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्या भाजपच्या प्रवक्त्याही होत्या. त्यांचा आमदारकीचा कार्यकाळ जून २०२४ मध्ये संपणार होता.

२००४ च्या १४ व्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी कनकपूर मतदारसंघात माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचा पराभव केला होता. सध्या त्या बंगळुरू ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होत्या. कर्नाटकात दोन टप्प्यांत २६ एप्रिल आणि ७ मे रोजी लोकसभेसाठी मतदान होणार आहे. २०१९ मध्ये भाजपविरोधात काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल निवडणुकीत एकत्रित उतरले होते.

 

Related Articles