शिवतारे यांची तलवार म्यान !   

सासवड, (वार्ताहर) : गेले काही दिवस बारामती मतदारसंघातून अजित पवार यांच्या उमेदवाराच्या विरोधात आपण उभे रहाणार, अशी सिंहगर्जना करणारे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी अखेर आपली तलवार म्यान केली. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचे आपण काम करणार असून पुरंदरमधून महायुतीला म्हणजे घड्याळाला पन्नास हजारांचे मताधिक्य मिळवून देऊ, असा विश्वासही शिवतारे यांनी व्यक्त केला.

सासवड (ता. पुरंदर) येथे शिवतारे यांनी काल पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्याशी आपण चर्चा केली. माझ्यामुळे महायुतीचे ८-१० उमेदवार अडचणीत येत असतील व मुख्यमंत्र्यांना त्रास होणार असेल तर आपण वेळेतच थांबलेले बरे म्हणून मी हा निर्णय घेतला. मी जनतेच्या विकासाचा विचार केला.

गुंजवणीचे पाणी पुढील दोन महिन्यांत पुरंदरला मिळणार असेल, असा विश्वास व्यक्त करतानाच पुरंदर विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असेही ते म्हणाले. सासवड नगरपालिकेची कामे मार्गी लागतील म्हणून आपण थांबत असल्याचे शिवतारे यांनी सांगितले.  

 

Related Articles