मिझोराममधील एका जागेसाठी सहा उमेदवार रिंगणात   

आयझॉल : मिझोरामच्या लोकसभेच्या एकमेव जागेसाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये एका अपक्ष उमेदवाराचा समावेश आहे. २०१९ च्या निवडणुकीतही सहा उमेदवार रिंगणात होते.

मिझोराममध्ये १९ एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. मिझोरामचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी एच. लियानझेला यांनी याबाबतची माहिती देताना सांगितले की, उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे सहा उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये एका महिला उमेदवाराचा समावेश आहे. २०१९ च्या निवडणुकीतही एका महिलेसह सहा उमेदवार उभे होते. सत्ताधारी झोरम पीपल्स मूव्हमेंटने (झेडपीएम) रिचर्ड वनलालहमंगइहा यांना उमेदवारी  दिली आहे. मुख्य विरोधी पक्ष मिझो नॅशनल फ्रंटने (एमएनएफ) विद्यमान राज्यसभा सदस्य के. वनलालवेना यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने प्रदेशाध्यक्ष वनलालहमुअका यांना रिंगणात उतरविले आहे. काँग्रेसने निवृत्त मिझोराम पोलिस सेवा (एमपीएस) अधिकारी आणि राज्याचे माजी गृहसचिव लालबियाकझामा यांना उमेदवारी दिली. पीपल्स कॉन्फरन्स पार्टीने सुप्रसिद्ध गायिका आणि गीतकार रीटा मालस्वामी यांना रिंगणात उतरविले आहे. भाजपचे माजी नेते आणि काँग्रेसचे माजी कार्यकर्ते लालहृतरेंगा छांगटे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.

 

Related Articles