कमलनाथ यांची प्रतिष्ठा वाचविण्यासाठी सासूसह सूनही प्रचाराच्या मैदानात   

भोपाळ : मध्य प्रदेशातील छिंदवाडा मतदारसंघात काँगे्रसकडून नकुलनाथ निवडणुकीच्या रिंगणात असले तरी कमलनाथ यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कमलनाथ यांच्यासाठी प्रतिष्ठेचा असलेला हा मतदारसंघ काबीज करण्यासाठी  माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे संपूर्ण कुटुंब मैदानात उतरले आहे. नकुलनाथ यांना विजयी करण्यासाठी त्यांची आई अलका नाथ आणि  पत्नी प्रिया नाथ प्रचार करत आहेत. सासू आणि सुनेची ही जोडी शहरापासून खेड्यापाड्यातील नागरिकांना काँग्रेसच्या ४४ वर्षांच्या कार्याची आठवण करून देत आहेत.

मध्य प्रदेशातील लोकसभेच्या २९ जागांपैकी केवळ छिंदवाडा ही जागा काँग्रेसकडे आहे, ती बळकावण्यासाठी सत्ताधारी भाजपने आपली सर्व ताकद लावली आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या निकटवर्तीय दीपक सक्सेना यांना भाजपमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात अलका यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

७१ वर्षांपासून काँग्रेसची सत्ता  

छिंदवाडा लोकसभा मतदारसंघावर गेल्या ४४ वर्षांपासून कमलनाथ यांच्या कुटुंबाचा ताबा आहे. गेल्या वर्षांतील एक पोटनिवडणूक वगळता ही जागा गेली ७१ वर्षे काँग्रेसकडे आहे. त्यामुळे या जागेला कमलनाथ यांचा बालेकिल्ला म्हणतात.  

गाव-खेड्यांमध्ये प्रचार

अलका नाथ आणि सून प्रिया या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत गावोगावी प्रचार करत आहेत. नुकतीच प्रिया नाथ यांनी ग्रामीण महिलांची शेतात भेट घेतली होती. त्यावेळी शेतात डोक्यावर पदर घेऊन त्यांनी गव्हाची कापणी केली होती. आदिवासीबहुल छिंदवाडामध्ये सासू-सूनेची ही जोडी चांगलीच लोकप्रिय होत आहे. छिंदवाडा येथील भाजपचे उमेदवार बंटी साहू २०१९ च्या विधानसभा पोटनिवडणुकीत कमलनाथ यांच्याकडून पराभूत झाले आहेत. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीतही ते कमलनाथ यांच्या विरोधात उभे होते. त्यातही त्यांचा पराभव झाला.

 

Related Articles