पुण्यात वंचितचा फटका कोणाला?   

पुणे लोकसभा मतदारसंघ : विजय चव्हाण

वसंत मोरे यांनी आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी महाविकास आघाडीबरोबर संपर्कही साधला. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीगाठी त्यांनी घेतल्या होत्या. महाविकास आघाडीने आमदार रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता मोरे यांनी थेट वंचितशी संपर्क साधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. मोरे यांनी काल आंबेडकर यांची भेट घेतली. त्यांची लोकसभेच्या उमेदवारी संदर्भात चर्चा झाली आहे. आणखी चर्चा होणार असून, यावर योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे आंबेडकर यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

तीन वेळा नगरसेवक म्हणून मोरे निवडून आले आहेत. शहरामध्ये मोरे यांची  वेगळी ओळख आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याचे आंदोलन उभारल्यानंतर त्याला मोरे यांनी उघड विरोध केला होता. पुणे लोकसभेची जागा आपण मनसेमधून लढवण्यास इच्छुक असल्याचे मोरे यांनी पक्षाला कळवले होते. मात्र मनसेने पुणे लोकसभेसंदर्भात नकारात्मक अभिप्राय पाठवल्यानंतर मोरे यांनी मनसेला रामराम ठोकला. आपल्याला जाणीवपूर्वक डावलले जात आहे, असा शहरातील पदाधिकार्‍यांवर त्यांनी थेट आरोप केला होता.

पुणे लोकसभेसाठी आता वंचितचा पर्याय मोरे यांच्या समोर आहे. आंबेडकर आणि महाविकास अघाडीतील बोलणी फिसकटल्यामुळे आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे नऊ उमेदवारांची घोषणा केली आहे. पुणे लोकसभेसाठी मोेरे यांना उमेदवारी मिळाल्यास पुण्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे गिरीश बापट हे विजयी झाले होते. त्यांना ६ लाख ३२ हजार मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांना ३ लाख ८ हजार मते मिळाली. वंचितकडून उभे असणारे अनिल जाधव यांना ६४ हजार मते मिळाली होती. त्यामुळे वंचित ने ६ टक्के मते या निवडणुकीमध्ये मिळवली.
सध्या पुण्यात सरळ लढत होणार अशी चर्चा असतानाच मोरे सुध्दा निवडणूक रिंगणात उतरत आहेत. त्यामुळे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास मोरे कोणाची मते घेणार याकडे लक्ष लागले आहे. मोरे हे कात्रज भागात राहतात. बारामती आणि शिरुर मतदारसंघाचा हा भाग आहे. अशात, मोरे यांनी पुण्याच्या निवडणूक रिंगणात उडी घेतल्यास याचा प्रभाव तीन लोकसभा मतदारसंघांवर पडणार आहे.

कात्रज भागात मोेरे यांचे वर्चस्व आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये मोरे यांनी मनसेकडून निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांना ३४ हजार ८०९ मते मिळाली. याचा फटका भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर यांना बसला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चेतन तुपे हे २ हजार ८२० मतांनी निवडून आले.
लोकसभा निवडणूक मात्र वेगळी आहे. वंचितकडून निवडणूक रिंगणात उतरल्यास याचा फटका थेट काँग्रेस पक्षाला बसतो. त्यामुळे काँग्रेसच्या दृष्टीने हे आवाहन असणार आहे. दुसरीकडे पुण्यात मनसेची ताकद आहे. ही मते मोरे यांना मिळाल्यास  त्याचा भाजपला सुध्दा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोरे हे कोणासाठी डोकेदुखी ठरणार हे पाहावे लागणार आहे.

२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये एमआयएम आणि वंचित बहुजन विकास आघाडी यांच्या उमेदवारांमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना फटका बसला. २०१९ मध्ये ९ लोकसभा मतदार संघ असे आहेत जेथे वंचितच्या प्रभावामुळे आघाडीचे गणित बिघडले. त्यामुळे यावेळी असा फटका बसू नये यासाठी मोठ्याप्रमाणात प्रयत्न करण्यात आले. भारत जोडो यात्रेदरम्यान  काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रकाश आंबेडकर यांना व्यासपीठावर आमंत्रित केले.

त्यावरून महाविकास आघाडीमध्ये आंबेडकर येतील अशी शक्यता होती, मात्र तसे झाले नाही. वंचितचा फटका आघाडीला बसू नये म्हणून महाविकास आघाडीकडून संविधान वाचवण्यासाठी आंबेडकर यांनी आमच्याबरोबर यावे असे सांगितले जात आहे. मात्र आंबेडकर वेगळ्याच भूमिकेत दिसत आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे ते लढत असलेल्या शक्तींनाच फायदा होणार असल्याचा प्रचार आता महाविकास आघाडीकडून केला जात आहे.  

पुण्यातील लोकसभा निवडणूक तिरंगी होण्याची दाट शक्यता आहे. वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली असून,  ते वंचितचे उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे याचा फटका भाजप की काँगेे्रसला बसणार याची चर्चा आत्तापासूनच सुरू झाली आहे.

 

Related Articles