मी निष्ठावान शिवसैनिक; कोठेही जाणार नाही : दानवे   

मुंबई : माझ्या भाजप प्रवेशाच्या वावड्या उठवल्या गेल्या. मात्र, मी निष्ठावान शिवसैनिक असून, ठाकरे गटातून बाहेर पडणार नाही, असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले.छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिल्यानंतर अंबादास दानवे नाराज असल्याची चर्चा सुरू होती. अशातच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठल्या. समाजमाध्यमांनीही तसे वृत्त प्रसिद्ध केले.  त्यानंतर दानवे यांनी पत्रकार पऱिषद घेत यासंदर्भात नाराजी व्यक्त केली. दानवे म्हणाले, माझ्या भाजप प्रवेशाच्या खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत. ज्यांनी बिनबुडाचे वृत्त दिले, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मी चाचपणी करत आहे. मी निष्ठावान शिवसैनिक असल्याने कोणत्याही पक्षात जाणार नाही. माझ्या तीस वर्षांच्या निष्ठेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

चंद्रकांत खैरे आणि मी दोघांनी देखील उमेदवारी मागितली होती, एवढाच काय तो विषय होता. ज्या दिवशी खैरेंची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी मी नाराज असू शकतो, रोज रोज नाराजी नसते. आता आम्ही खैरेंच्या नेतृत्वाखाली काम करणार आहोत. उद्धव ठाकरेंचे हात बळकट करण्यासाठी मी काम करणार आहे. मी अनेक गावांचा दौरा केला आहे, अजून बर्‍याच गावात मी जाऊन दौरा करणार आहे.

 

Related Articles