वायनाडमधील भाजप उमेदवारावर २४२ गुन्हे दाखल   

राहुल गांधी यांच्या विरोधात लढवणार निवडणूक

तिरूअनंतपुरम : केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी मैदानात आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने के. सुरेंद्रन यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे भाजपच्या या उमेदवारावर २४२ गुन्हे दाखल आहेत.सुरेंद्रन हे केरळ भाजपचे अध्यक्ष आहेत. नुकतेच त्यांनी आपल्या पक्षाच्या मुखपत्रात आपल्यावर असलेल्या गुन्ह्यांची माहिती प्रकाशित केली आहे.

भाजपचे नेते जॉर्ज कुरियन यांनी यासंदर्भात सांगितले की,  सुरेंद्रन यांच्यावर एकूण २४२ गुन्हे दाखल आहेत. यापैकी बहुतांश प्रकरणे २०१८ मध्ये साबरीमाला आंदोलनाशी संबंधित आहेत, जी न्यायालयात प्रलंबित आहेत. जेव्हा पक्षाचे नेते आंदोलन किंवा बंद पाळण्याचे आवाहन करतात, तेव्हा पोलिस त्या प्रकरणी गुन्हा नोंदवतात. २३७ गुन्हे हे एकट्या साबरीमाला आंदोलनाशी संबंधित आहेत, तर ५ केरळमधील विविध आंदोलनाशी संबंधित आहेत.  

सुरेंद्रन यांच्यासोबतच एर्नाकुलम येथील उमेदवार के. एस. राधाकृष्णन यांच्याविरोधात देखील २११ गुन्हे दाखल आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, उमेदवारांना आपल्याविरोधात दाखल सर्व गुन्ह्यांची माहिती कुठल्याही वृत्तपत्रात प्रकाशित करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

 

Related Articles