‘आप’कडून आशीर्वाद मोहीम   

नवी दिल्ली : कथित मद्य घोटाळा प्रकरणात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीत जनतेचा पाठिंबा मिळावा, यासाठी आम आदमी पक्षाने आता ‘केजरीवालांना आशीर्वाद’ ही  मोहीम सुरू केली आहे.  केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी एक चित्रफीत जारी करून या मोहिमेची घोषणा केली.

सुनीता केजरीवाल यांनी जारी केलेल्या चित्रफीतमध्ये म्हटले आहे की, काल न्यायालयात अरविंद केजरीवाल यांनी मांडलेली बाजू सर्वांनी ऐकलीच असेल. त्यांनी न्यायालयासमोर जे काही सांगितले, त्यासाठी मोठे धाडस लागते. ते खरे देशभक्त आहेत. अगदी अशाच प्रकारे आपले स्वातंत्र्यसैनिक इंग्रजांशी लढत होते. मी मागील ३० वर्षांपासून त्यांच्या सोबत आहे. देशभक्ती त्यांच्या रोमारोमात आहे. केजरीवाल यांनी देशातील सर्वात शक्तिशाली, भ्रष्टाचारी आणि हुकूमशाही शक्तींना आव्हान दिले आहे. तुम्ही केजरीवाल यांना तुमच्या कुटुंबातीलच एक सदस्य मानले आहे, त्यामुळे या लढाईत त्यांना साथ द्या.  आपण सर्वजण एकत्र येऊन हा लढा देऊ.

तसेच ८२९७३२४६२४ हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक जाहीर करत त्यावर केजरीवाल यांना आशीर्वाद, शुभेच्छा संदेश, तसेच मनातल्या भावना पाठविण्याचे आवाहन केले आहे. या क्रमांकावर येणारा प्रत्येक संदेश तुरुंगात असलेल्या केजरीवाल यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येईल, असेही सुनीता यांनी सांगितले.

 

Related Articles