महायुतीकडून आचारसंहितेचा भंग   

पवारांच्या राष्ट्रवादीची आयोगाकडे तक्रार

मुंबई,  (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नावे दिली आहेत. पण दुसर्‍या पक्षाच्या नेत्यांची नावे आपल्या पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत टाकून शिंदे गटाने आचारसंहितेचा भंग केला असून या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) नेते जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्या पक्षाचे नेतृत्व करतात त्या पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये दोन चुका केल्या आहेत.
शिंदे यांनी आपल्या यादीत पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नावे दिली आहेत. त्याचप्रमाणे भाजपने त्यांच्या यादीत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव नमूद केले आहे. नियमानुसार कोणाची नावे अशा स्टार प्रचारकाच्या यादीत टाकू शकता, याची स्पष्टता निवडणूक आयोगाने दिली आहे. मात्र, या पक्षांनी अशा पद्धतीने नावे वापरली असतील तर निवडणूक आयोगाला त्यांच्यांवर बंदी घालण्याचा अधिकारही आहे. हा प्रकार म्हणजे निवडणूक आचारसंहितेचा सर्रास केलेला सर्वांत मोठा भंग आहे. कारण तुम्ही दुसर्‍या पक्षांच्या नेत्यांना आपल्या पक्षाच्या यादीत टाकू शकत नाही, याकडे आव्हाड यांनी लक्ष वेधले.

एकनाथ शिंदे आणि भाजपने त्यांच्या स्टार प्रचारक यादीचा भाग म्हणून इतर राजकीय पक्षांमधील विविध व्यक्तींची नावे प्रसिद्ध केली आहेत, जी लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ७७ चे उल्लंघन करणारी आहे असे तक्रारीत नमूद केले आहे.

 

Related Articles