गीतारहस्यातील भक्तिविचार हे कर्ममार्गाचे साधन   

डॉ. वैशाली दाबके यांचे प्रतिपादन

पुणे : कर्मयोगातील तत्त्वे भक्तिमार्गातही लागू होतात. भक्ती, ज्ञान आणि कर्मयोगात भेद नाही. गीतेतील भक्तिविचार हाच निष्काम कर्ममार्ग आहे. भक्ती हे कर्ममार्गाचे साधन आहे. लोकमान्य टिळकांनी गीतारहस्यातून ज्ञानयुक्त भक्तिमय निष्काम कर्मयोगाचा सिद्धांत मांडला आहे, असे प्रतिपादन डॉ. वैशाली दाबके यांनी केले.

‘केसरी’ व टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे गीतारहस्य जयंतीनिमित्त आयोजित ‘गीतारहस्यातील भक्तिविचार’ या विषयावर डॉ. वैशाली दाबके यांचे शनिवारी ऑनलाईन व्याख्यान झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. उपासना आणि भक्ती एकच आहेत. निष्काम बुद्धीने केलेली भक्ती सर्वश्रेष्ठ असते. भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्गातील साम्य लोकमान्यांनी गीतारहस्यातून स्पष्ट केले असल्याचेही डॉ. दाबके यांनी नमूद केले आहे.

डॉ. दाबके म्हणाल्या, इंग्रजीतूनही लोकमान्यांनी काही पुस्तके लिहिली आहेत. मात्र गीतेतील कर्मयोग लोकांना शिकवायचा होता म्हणून त्यांनी मराठीतून गीतारहस्य लिहिले. मंडालेच्या तुरुंगात सुमारे पाच महिन्यांत लोकमान्यांनी गीतारहस्य लिहून पूर्ण केले. गीतारहस्यातील भक्तिविचार प्रामुख्याने ९ ते १२ व्या अध्यायात करण्यात आलेला आहे. त्यात भक्तिमार्गाची लक्षणे, तत्त्वे सांगितली आहेत. भक्तियोग नाव असलेल्या १२ व्या अध्यायात भक्तिमार्ग व त्याचे स्वरूप उदाहरणासह समजावून सांगितले आहे.

ज्ञानाच्या मुळाशी श्रद्धा आहे. बहुतांश व्यवहारातही श्रध्दा आहे. मानवी मनात श्रद्धा कायम असते. विचार प्रक्रियेत बुद्धी निर्णय करते. त्यामुळे बुद्धीतील ज्ञान आचरण आणि व्यवहारात उतरले पाहिजे. विविध प्रकारच्या विचारावरून  मनुष्यात मतभेद आहेत. भक्तिमार्गात श्रद्धेला विशेष महत्त्व आहे. भक्ती हे साधन आहे, साध्य नाही. त्यामुळे भक्तीला निष्ठा म्हणता येत नाही. प्रतीक म्हणजे मन स्थिर करण्याचे साधन आहे. बुद्धीशिवाय श्रद्धा अपुरी असते. श्रद्धा आणि ज्ञान यांची सांगड घालूनच मानव आध्यात्मिक उन्नती साधू शकतो, असे स्पष्ट करून लोकमान्यांनी वाचकांच्या मनात भक्तिमार्गाविषयी उपस्थित झालेल्या प्रश्नांना गीतारहस्याच्या माध्यमातून सहज, सोप्या भाषेत उत्तरे दिली असल्याचेही डॉ. वैशाली दाबके यांनी सांगितले.

 

Related Articles