पुण्यातून धावणार्‍या रेल्वे गाड्यांना गर्दी   

पुणे : दहावी, बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत. तसेच या महिन्यात लग्नाच्या तारखाही आहेत. त्यामुळे लोक घराबाहेर पडत आहे. त्याचाच परिणाम म्हणून पुण्यातून धावणार्‍या बहुतांश रेल्वे गाड्यांना गर्दी वाढली आहे. तसेच पुढील तीन महिन्यांचे आरक्षणही मोठ्या प्रमाणावर झाले असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पुणे विभागातून देशाच्या वेगवेगळ्या भागात धावणार्‍या प्रमुख गाड्यांचे तिकीट पुढील दोन-अडीच महिने म्हणजे जूनपर्यंत फुल्ल झाले आहे. परिणामी ऐनवेळी सुट्टीच्या हंगामात प्रवासाचा बेत करणार्‍यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. प्रवाशांची वाढती गर्दी पाहता प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी रेल्वे प्रशासनालाही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

पुणे हे शहर उद्योग, शिक्षण तसेच ऐतिहासिक ठिकाण असल्याने येथे पर्यटकांची मोठी रेलचेल असते. तसेच पुण्यात बाहेरील राज्यातून कामानिमित्त व नोकरीसाठी ये-जा करणार्‍यांची संख्या मोठी आहे.

त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरून दररोज किमान दीड ते दोन लाख प्रवासी प्रवास करत असतात. परिणामी एसटी बससह रेल्वे प्रवासाला अधिक प्राधान्य देण्यात येत असल्याने येथून तिरुपतीसह मुंबई, दिल्ली, दानापूर, कोलकाता, चेन्नई, गोरखपूर आदी महत्त्वपूर्ण शहरांत रेल्वेसेवा सर्व प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. सध्या दहावी, बारावीची परीक्षा झाल्या आहेत. तर शालेय परीक्षा पूर्ण होण्यास अजून किमान पंधरा-वीस दिवसांचा कालावधी आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्टीत बाहेर फिरायला जाणार्‍या प्रवाशांचे नियोजन सुरू झाले आहे. आतापासूनच साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रमुख रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण फुल्ल झाले आहे.

त्यामुळे परीक्षांनंतर बाहेर पर्यटनास जाणार्‍या पर्यटकांच्या रेल्वे सुविधेचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रमुख गाड्या पुण्यातून उत्तरेकडे धावणार्‍या जम्मू-तावी झेलम एक्स्प्रेस, दानापूर एक्स्प्रेस, आझाद हिंद एक्स्प्रेस, गोरखपूर एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस या सर्व गाड्यांना १५ जूनपर्यंत जवळपास शंभर ते दोनशेपर्यंत वेटिंग आहे. तर, मुंबईतून सुटणार्‍या व दक्षिणेकडे जाणार्‍या कन्याकुमारी एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक एक्स्प्रेस, सीएसएमटी-चेन्नई एक्स्प्रेस, त्रिवेंद्रम एक्स्प्रेस, उद्यान एक्स्प्रेस या प्रमुख गाड्यांना साधारणपणे २० मे पर्यंत तिकीट फुल्ल आहे.

 

Related Articles